छत्रपती संभाजीनगर : मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांच्या मिसारवाडीत बाराही महिने चिखल तुडवावा लागत होता. गेल्या पंचवीस वर्षांत हळूहळू वीज, ड्रेनेज, रस्ते झाले अन् मिसारवाडी चिखलमुक्त झाली. त्याचबरोबर झोपड्यांच्या जागी पक्की घरे उभारली गेली. औद्योगिक क्षेत्रातून सिमेंट रस्ता झाल्याने रहदारीची सोय झाली. पण वसाहत अजूनही टँकरमुक्त नाही. जलवाहिनीतून पाणी हवे आणि डी.पी.ला कुंपण या रहिवाशांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत.
नागरिकांचीही साथ मिळतेसमस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांचीही तेवढीच साथ मिळत असल्याने निधी आणणे शक्य होते. मनपा टाकत असलेल्या जलवाहिनीमुळे टँकरमुक्ती अवश्य होईल. येथे महादेव सूर्यवंशी, भगवान रगडे, शकुंतला इंगळे, आनंद घोडेले यांनी काम केलेले आहे. सध्या विकासकामांवर भर दिला जात आहे.- शबनम बेगम कलीम कुरेशी, माजी नगरसेविका
उघड्या डी.पी.ना कुंपण लावा...विजेच्या तारा जुन्या असल्याने सातत्याने भार येऊन त्या तुटतात. जी-२० मध्ये शहर सुंदर केले होते; परंतु मिसारवाडीतील डी.पी. आजही उघड्या असून रस्त्यालगत असल्याने दुर्घटनेची भीती आहे. महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे.- मुनीर पटेल
बचत गटांच्या महिलांना वाव द्यावा..मनपाकडून चालविल्या जाणाऱ्या कामासाठी बचत गटातील महिलांना समाविष्ट करावे, त्यांच्या उपक्रमातून कुटुंबाला हातभार लागून प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी मदत होणार आहे. मनपा अधिकाऱ्यांनी रोजगाराकडे लक्ष द्यावे.- गीताबाई म्हस्के
घरकुल योजनेची गती वाढवावी...लोकप्रतिनिधींनी असाच हातभार लावल्यास दुर्लक्षित वसाहत विकसित होईल. झोपड्यांचा विकास होण्यासाठी असलेल्या घरकुल योजनेचे धनादेश निघण्यास विलंब होतो. त्यामुळे गरीब कुटुंबांचा जीव मेटाकुटीस येतो.- अजीज खान
अंतर्गत रस्ते बनवा...प्रमुख रस्ते तयार केल्याने मुख्य समस्या सुटली; परंतु अंतर्गत रस्ते तयार नसल्याने टँकर घरापर्यंत येत नाहीत. अनेकदा पाण्यासाठी धावपळ होते. हे टाळण्यासाठी उर्वरित रस्त्यांची कामे मार्गी लावावीत.- अमोल म्हस्के