छत्रपती संभाजीनगर : शहरातील बौद्धलेणी डोंगररांगांमध्ये पश्चिमेला दहा किलोमीटर अंतरावरील हरण कडका डोंगरमाथ्यावरील ३० एकरांहून अधिक प्रशस्त व निसर्गरम्य परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऊर्जाभूमी आकार घेत आहे.
डोंगरावर उभी राहत असलेली दीक्षाभूमीची प्रतिकृती आणि ९० फूट उंचीच्या स्तुपाचा परीघ ४७ मीटर एवढा भव्य आहे. चेतन कांबळे यांच्या संकल्पनेतून हे अनोखे असे दहा मजली आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक साकारत आहे. त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
काय असेल सुविधा?इगतपुरीच्या धर्तीवर १०० व्यक्तींसाठी विपश्यना केंद्र, निवासी संकुल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र, भिक्कू प्रशिक्षण केंद्र, आरोग्य केंद्र, निवासी शाळा आदी प्रकल्प येथे सुरू होतील.
ही असतील वैशिष्ट्येया स्मारकाचा परीघ ४७ मीटरचा, तर ३६ मीटरची डोम परिक्रमा आहे. उंची ९० फूट असेल. डॉ. आंबेडकर यांचा भव्य उभा पुतळा, अशोक स्तंभ, पंचशील ध्वज, स्तुपाला चार मुख्य प्रवेशद्वार आणि डोंगररस्त्याने सांचीची प्रतिकृती असलेले दहा प्रवेशद्वार या ऊर्जाभूमीला असतील.
‘ऊर्जे’चा मध्यबिंदूपूर्वेस बौद्धलेणी, भीमटेकडी, लोकुत्तरा महाविहार आणि पश्चिमेस मनपाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क, जटवाडा येथे प्राचीन दिगंबर जैन मंदिर, वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला यांचे ही ऊर्जाभूमी मध्यबिंदू आहे.