छत्रपती संभाजीनगर : शहरातील मतदारांनी तीन वेळेस आमदार, एकदा खासदार म्हणून संधी दिली. ३५ वर्षे सत्तेत असतानाही शहराच्या विकासासाठी काय केले? शहराला भकास करून सोडले. नागरिकांना दररोज पाणीसुद्धा देता आले नाही, अशी टीका औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
प्रश्न - मतदारांनी उद्धवसेनेला मतदान का करावे?उत्तर - महाराष्ट्रद्रोही मंडळी राज्याला विकून खात आहेत. लुटा आणि वाटा हे महायुतीचे धोरण आहे. महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा केला. उद्धव ठाकरे यांनी कोविडमध्ये नेत्रदीपक काम केले. पुन्हा त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मतदान करावे.
प्रश्न - आपण आजपर्यंत कोणता विकास केला?उत्तर - विकासकामे भरपूर केली. सुरेवाडी, मयूर पार्क, भगतसिंग नगर येथील ड्रेनेजचा प्रश्न सोडवला. जलकुंभासाठी न्यायालयात गेलो. फ्री होल्डचा लढा लढला आणि जिंकला. रस्त्यांचे जाळे मजबूत केले.
प्रश्न - दोन्ही सेनेतील मत विभाजनाचा फायदा एमआयएमला होणार नाही का?उत्तर - मतविभाजन होणार नाही. हिंदूंसह सर्वधर्मीयांची मते एकत्रित महाविकास आघाडीला मिळतील. आम्ही विभाजनावर अवलंबून नाही.