छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेत पडेगाव, तीसगाव, हर्सूल, सुंदरवाडी येथे महापालिका घरे बांधणार आहे. महापालिकेकडे ४० हजारांवर लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. लाभार्थ्यांना नेमके घर कुठे पाहिजे, यासाठी चॉईस फाॅर्म भरून द्यावा लागेल. एकाच ठिकाणी घरांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ड्रॉ पद्धतीचाही अवलंब केला जाईल. कंत्राटदारांनी बँक गॅरंटी अद्याप भरली नाही. बँक गॅरंटी जमा झाल्यानंतर वर्कऑर्डर दिली जाईल. त्यानंतर नगररचना विभाग बांधकाम परवानगी देईल.
पंतप्रधान आवास योजनेत अत्यंत स्वस्तात घर मिळेल या आशेने शहरातील ४० हजारांवर बेघर नागरिकांनी महापालिकेकडे अर्ज केले. मागील अनेक वर्षांपासून घरांच्या योजनेलाच घरघर लागली होती. अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर प्रश्न मार्गी लागला. महापालिका चार ठिकाणी कंत्राटदारांच्या मदतीने पाच प्रकल्प उभारणार आहे. सात मजली इमारती बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक इमारतीला पार्किंग, लिफ्टची व्यवस्था राहील. पहिल्या टप्प्यात किमान ११ हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव वगळता चार ठिकाणच्या कंत्राटदारांनी महापालिकेकडे सेक्युरिटी डिपॉझिटची रक्कम भरली आहे. पडेगावच्या कंत्राटदारालाही सेक्युरिटी डिपॉझिट भरण्याची सूचना केली. लवकरच कंत्राटदारांना महापालिकेकडून कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) दिली जाणार आहे. वर्कऑर्डर मिळाल्यावर कंत्राटदार नगर रचना विभागाकडे प्रस्ताव दाखल करून बांधकाम परवानगी घेतील. बांधकाम परवानगी घेतल्यावर आवास योजनेच्या कामाचा नारळ फोडला जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच पालिका संबंधित विकासकाशी करारनामा करणार आहे.
मनपा वाटणार चाॅईस फॉर्मआवास योजनेत घर मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पालिकेकडे चॉईस फॉर्म भरावा लागणार आहे. म्हाडाच्या नियमानुसार लाभार्थ्याला घरकुलाच्या एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम पालिकेकडे सुरुवातीला जमा करावी लागणार आहे. ही रक्कम जमा केल्यावर पालिकेकडून त्यास घर वितरित करण्यात आल्याचे पत्र दिले जाणार आहे. या पत्राच्या आधारे लाभार्थीला कर्जासाठी बँकेत प्रस्ताव सादर करता येईल.