छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त केल्यानंतर महापालिकेने शहागंज चमन परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा विडा उचलला. दोन दिवस सतत कारवाई केल्यानंतर अतिक्रमणमुक्त चमन बहरला. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. मंगळवारी दुपारी सिटीचौकातील अत्तर गल्लीत कारवाईला सुरूवात करण्यात आली. येथील अरुंद गल्ल्यांमध्ये जेसीबी जात नसल्याने व्यापाऱ्यांना स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आला. अतिक्रमण काढल्यानंतर दररोज मनपाचे पथक संपुर्ण परिसरात पेट्रोलिंग करणार आहे.
शहागंज भागात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. व्यापारी, फळ विक्रेत्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती. चारचाकी वाहन तर या भागातून ये-जा करू शकत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीने शहर बसेसही बंद केल्या. दुचाकी वाहनधारकांनाही प्रचंड त्रास होता. यापूर्वी अनेकदा मनपाने अतिक्रमणे हटविली. आज कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी तिच परिस्थिती राहत होती. यंदा मनपाने कारवाईच्या पॅटर्नमध्ये थोडासा बदल केला. सोमवारी शहागंज पेट्रोल पंप, क्लॉक टॉवरची चप्पल गल्लीत कारवाई केली. मंगळवारी चमनच्या परिसरातील सर्व अतिक्रमणे हटविली. निझामोद्दीन चौकातून संस्थान गणपतीकडे लेफ्ट टर्न घेताना एका फळ विक्रेत्याने अतिक्रमण केले होते. हा लेफ्ट टर्न पूर्णपणे मोकळा केला.
या भागात मनपाने पेट्रोलिंग सुरू केली. दुपारनंतर अतिक्रमण हटाव विभागाचा ताफा सिटीचौकात दाखल झाला. अत्तर गल्लीतून सुरूवात केली. अत्तर गल्लीतील छोट्या-छोट्या गल्ल्यांमधील अतिक्रमणे व्यापाऱ्यांनी स्वत: काढायला सुरूवात केली. उद्या सुद्धा याच भागात कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. कारवाईत उपायुक्त सविता सोनवणे यांचीही उपस्थिती होती.