छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व पक्षांची नजर विधानसभा निवडणुकीकडे लागली आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदेसेना आणि ठाकरेसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणे सुरू केले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची कसोटी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून सर्वाधिक मते मिळाली. तब्बल ९५ हजार ५८६ मते शिंदेसेनेला मिळाली. त्यामुळे येथील शिंदेसेनेचे आ. संजय शिरसाट हे या मतदारसंघात स्ट्राँग असल्याची स्थिती आहे. मात्र, ठाकरेसेना येथे दुसऱ्या क्रमाकांवर राहिली. शिवाय विधानसभा निवडणुकीत येथून ठाकरेसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरेसेना आणि शिंदेसेनेत येथे चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद ‘मध्य’मध्ये शिंदेसेना दुसऱ्या आणि ठाकरेसेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्याबरोबर ‘पूर्व’मध्येही शिंदेसेना दुसऱ्या आणि ठाकरेसेना तिसऱ्या क्रमाकांवर राहिली. फुलंब्रीत तर सेनेचे अस्तित्वच नाही. शहरातील चार मतदारसंघांत शिंदेसेनेचे जास्त आमदार असूनही विधानसभेच्या दृष्टीने शिवसेनेसाठी (शिंदेसेना) चितेंची स्थिती आहे.
विधानसभेत शिंदेसेनेची कसोटी लागेललोकसभा निवडणुकीत ठाकरेसेना कन्नडमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर राहिली. मात्र, कन्नडमध्ये ठाकरेसेनेची परिस्थिती प्रबळ आहे, हे आताच सांगता येणार नाही. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. येथेही ठाकरेसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. वैजापूरमध्ये शिंदेसेनेची स्थिती बरी आहे. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला वाव नसल्याची स्थिती आहे. पैठण विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये शिवसेना उमेदवार संदीपान भुमरे हे आमदार म्हणून निवडून आले होते. येथे राष्ट्रवादी-काँग्रेसचे अस्तित्व आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत येथेही शिंदेसेनेची कसोटी लागेल.