छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक रविवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता होणार असून या बैठकीत व्यवस्थापन परिषदेसाठीची निवडणूक, वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या बैठकीत विविध अधिकार मंडळावर अधिसभेतून सदस्यांची निवड होणार आहे. महात्मा फुले सभागृहात ही बैठक होणार असून बैठक व्यवस्थेचे पाहणी करून निवडणूक आणि अर्थसंकल्पाचा आढावा कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी शुक्रवारी घेतला. अर्थसंकल्पापेक्षा विद्यापीठ वर्तुळात सध्या निवडणूकीतील चुरशीबद्दलच चर्चा अधिक आहे.
अधिसभेच्या एकुण ७६ सदस्यांपैकी विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष, सचिव, राज्यपाल नियुक्त एक सदस्य आणि जि. प. शिक्षण समिती प्रतिनिधी या ४ नामनिर्देशित सदस्यांची पदे रिक्त आहेत. तर महिला प्राचार्य हे पदही रिक्त आहे. त्यामुळे निवडणूकीत एकुण ७१ सदस्यांचे मतदान असले. ७१ सदस्यांपैकी कुलगुरू यांच्यासह संवैधिनिक अधिकारी असे १८ मतदार आहेत. त्यामुळे शुक्रवारी उमेदवारांनी अधिकाऱ्यांच्या भेटी घेत मतदानाचे आवाहन केले. यावेळी उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार समोरासमोर आल्यावर एकमेकांना शुभेच्छाही दिल्या.
एका नावावर खलबतेराज्यपालांनी २ व्यवस्थापन परिषद सदस्य नियुक्त केल्यावर आणखी एका सदस्याची नियुक्ती झाली. मात्र, पहिली एक नियुक्ती रद्द केल्याबद्दल अधिकृत पत्रव्यवहार राजभवनाकडून झाला नसल्याने शुक्रवारी सायंकाळ पर्यंत प्रशासनात संभ्रम होता. त्यावर मतदान यादीतील ७१ सदस्यांचेच असेल असे कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी लोकमत ला सांगितले.
विद्या परिषद, स्थायी समितीवर सदस्य निवडणारयाच बैठकीत एक सदस्य विद्या परिषदेवर संस्थाच्या मालकामधून तसेच प्राचार्य, प्राध्यापक व पदवीधर मधून एक सदस्य स्थायी समितीवर निवडूण जाणार आहे. मागास प्रवर्गातील एक अध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे दोन सदस्य तक्रार निवारण समितीवर निवडले जाणार आहेत.
४ जागांसाठी ९ उमेदवार, ४ बिनविरोधअधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून येणाऱ्या खुल्या गटातील चारही जागांसाठी निवडणूक होणार आहे. शिक्षक प्रवर्गात डॉ.शंकर अंभोरे, डॉ.अंकुश कदम व डॉ भगवानसिंग ढोबाळ हे तीन उमेदवार आहेत. संस्थाचालकातून गोविंद देशमुख व बस्वराज मंगरुळे तर पदवीधर गटातून योगिता होके पाटील व प्रा.सुनील मगरे, प्राचार्य गटातून डॉ.विश्वास कंधारे व डॉ.भारत खंदारे यांच्यात सरळ लढत होणार आहे. अधिसभेच्या राखीव गटातून प्रत्येकी एकच अर्ज असल्यामुळे चार जन बिनविरोध निवडल्या गेले असून त्यांची निवडीची औपचारीक घोषणा रविवारी होईल.