- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, धुळे, जळगाव, दिंडोरी, जालना या लोकसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर असून या मतदारसंघात आपण किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याची सूचक प्रतिक्रिया या परिवाराचे प्रमुख स्वामी शांतीगिरी महाराज यांनी गुरुवारी व्यक्त केली.
वेरुळच्या आश्रमात या प्रतिनिधीने शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. यावेळी शांतीगिरी महाराजांचे उत्तराधिकारी रामानंद स्वामी महाराज हेही उपस्थित होते. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उभे राहून शांतीगिरी महाराजांना मिळालेली मते आजही सर्वांच्याच स्मरणात आहेत. तेव्हापासूनच महाराजांचे ‘राजकीय मूल्य’ राजकारण्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांची भेट व्हावी, यासाठी राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू झाली.
मागच्या वेळेचा पाठिंबा असा होता....मागील लोकसभा निवडणुकीत जय बाबाजी भक्त परिवाराने रावसाहेब दानवे (जालना), हर्षवर्धन जाधव (औरंगाबाद), डॉ. सुभाष भामरे ( धुळे), सदाशिव लोखंडे (शिर्डी), भारती पवार (दिंडोरी), हेमंत गोडसे (नाशिक) या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा दिला होता.
राष्ट्रहित आणि नरेंद्र मोदी यांना समर्थनराष्ट्रहितासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ हा पाठिंबा दिला गेला होता, पण शांतीगिरी महाराजांनी मनात आणले तर ते याच सात लोकसभा मतदासंघांतील राजकीय समीकरण बिघडवू शकतात. आणखी दहा वर्षे तरी नरेंद्र मोदी यांची देशाला गरज असल्याचे त्यांचे मत आहे. किंगमेकरची भूमिका बजावयाची आहे असे म्हणत असताना मतदारांनी त्यांना बिनविरोध संसदेत पाठवावे, अशी महाराजांच्या शिष्यसंप्रदायाची सुप्त इच्छाही लपून राहत नाही.
नरेंद्र मोदी यांची मागेच भेटया सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. निवडून आलेल्या खासदारांनी शांतीगिरी महाराजांचे आपल्या विजयातील योगदान मोठे असल्याचे सांगितले होते. कसलीही अपेक्षा न ठेवता देशहितासाठी त्यावेळी आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु, शांतीगिरी महाराजांना संसदेत येऊ देणं व त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर देशसेवा घडू देणंही गरजेचे असल्याचे त्यांच्या शिष्यवृंदांना वाटते. ३१ डिसेंबर रोजी वेरुळच्या आश्रमात अध्यात्म व श्रमदानाच्या निमित्ताने बाबाजींचा शिष्यवृंद एकत्र येणार आहे. त्यावेळी या मुद्यावर चर्चा होऊ शकेल, असे बोलले जाते.