छत्रपती संभाजीनगर : अतोनात मानसिक, शारीरिक छळ करून डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार डॉ. प्रीतम शंकर गवारे (२६) याला गुरुवारी १८ पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेत न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाने जवळपास १५ मिनिटांच्या युक्तिवादात प्रीतमच्या विकृत वागण्याचा पाढाच न्यायालयासमोर मांडला. दोन्ही पक्षाच्या ४० मिनिटांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रीतमला ३१ ऑगस्टपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
डॉ. प्रतीक्षा भुसारे (२६) या एमबीबीएस उत्तीर्ण तरुणीने २४ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये प्रीतमच्या छळाविषयी लिहून आयुष्य संपवले. सिडको पोलिसांनी बुधवारी प्रीतमला पडेगाव परिसरातून अटक केली. प्रतीक्षाचे वडील वकील असल्याने वकील संघटनांकडून या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी त्यांनी आंदोलन छेडल्यानंतर प्रीतमचे वकीलपत्र न घेण्याचा पवित्रा घेतला होता.
शाई हल्ल्याचा संशय, व्हीआयपी सुरक्षान्यायालयाच्या आवारात प्रीतमवर शाई किंवा अन्य प्रकारे हल्ला होण्याची भीती पोलिसांना होती. त्यामुळे १८ पोलिसांच्या सुरक्षेत त्याला गुरुवारी ३ वाजता न्यायालयात हजर केले. १५० ते २०० वकिलांनी कोर्ट रूम भरले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगावकर यांनी सुरुवातीलाच वकिलांना कुठलाही अनुचित प्रकार, घोषणाबाजी न करता न्यायालयाची गरिमा राखा, अन्यथा प्रत्येक गाेष्ट रेकॉर्डवर घेतली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर युक्तिवादास सुरुवात झाली. न्यायालयाच्या आत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. वकिलांनी यावर संताप व्यक्त केल्यावर न्यायालयाने देखील पोलिसांना धारेवर धरले.
जवळपास ४० मिनिटे युक्तिवाद चालला.-सहायक सरकारी वकील सय्यद शेहनाज, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. प्रीतमने केलेला गुन्हा गंभीर आहे. प्रतीक्षाच्या छळाचे प्रीतमच्या मोबाइलमध्ये महत्त्वपूर्ण पुरावे असून तो हस्तगत करायचा आहे, सुसाइड नोटच्या अनुषंगाने आरोपीची सखाेल चौकशी करणे गरजेचे असून प्रतीक्षाला हुंडा स्वरूपात पैशांची मागणी करण्यात प्रीतमसह अन्य कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करायचा असल्याने कोठडीची विनंती करण्यात आली.
१५ मिनिटे बंद दाराआडॲड. राजेश काळे यांनी प्रीतमच्या बाजूने युक्तिवाद केला. काही संवेदनशील मुद्दे मांडायचे असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर अन्य वकील व उपस्थितांना बाहेर जाण्याची सूचना करण्यात आली. जवळपास १५ मिनिटे बंद दाराआड युक्तिवाद चालला. काळे यांनी प्रतीक्षाची सुसाइड नोटच खोटी असल्याचा दावा करून सुसाइड नोट व्हायरल झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले.