छत्रपती संभाजीनगर : तलाठी परीक्षेत घोटाळेबाजांसोबत हात मिळवून परीक्षा केंद्राचेच कर्मचारी परीक्षार्थींना उत्तरे पुरवतात. यासाठी रॅकेट चालविणाऱ्यांकडून तीन लाख रुपयांचा दर ठरवला होता. मंगळवारी चिकलठाण्यातील आयऑन सेंटर बाहेर राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) याला रंगेहाथ पकडले होते. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यापूर्वी वनरक्षक परीक्षेत परीक्षा केंद्रावरीलच कर्मचारी घोटाळ्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते.
५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर नागरे उभा होता. पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याच्या मोबाइलमधील टेलिग्रामवर तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे ३४ प्रश्नांचे छायाचित्र सापडले. सकाळच्या परीक्षेतील अंकुश जाधव (रा. कातराबाद) या उमेदवाराला त्याने उत्तरे पुरवली होती, तर सायंकाळी एका उमेदवाराला तो त्याच प्रकारे उत्तरे पुरविण्याच्या तयारीत होता. उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव, अंमलदार संतोष सोनवणे, देवीदास काळे, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड यांनी त्याला रंगेहाथ पकडले.
तो कर्मचारी कोण?राज्यातील बहुतांश स्पर्धा परीक्षांचे कंत्राट टीसीएस कंपनीकडे आहे. त्यांच्यामार्फत राज्यात विविध ठिकाणी परीक्षा केंद्र नियुक्त करून परीक्षा घेतल्या जातात. या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांसोबत कंपनीचे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी असतात. नागरेच्या मोबाइलमध्ये बाबा पोलिस नावाने एक नंबर आढळला. त्याच्यासोबत तो उत्तरे पुरवण्यासाठी संपर्कात होता. केंद्रातून पेपर प्राप्त झाल्यानंतर त्याची उत्तरे ते केंद्रावरील कर्मचाऱ्याला पाठवतात. त्यानंतर तो कर्मचारी संबंधित परीक्षार्थीला पुरवतो. यासाठी तो कर्मचारी तीन लाख रुपये घेणार होता, अशी धक्कादायक माहिती नागरेच्या चौकशीत उघडकीस आली. असे जवळपास सात आरोपींचे हे रॅकेट आहे. निरीक्षक गाैतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.