छत्रपती संभाजीनगर: शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेची सद्यस्थिती पाहता पुढील दीड वर्ष तरी योजनेचे काम पूर्ण होणे शक्य नाही, असे असताना भाजपचे नेते तीन महिन्यात शहराला पाणी देण्याचे खोटे आश्वासन देत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
आ. दानवे म्हणाले की, राज्य सरकारने मनपाला आर्थिक सहकार्य देण्यास नकार दिला. मनपाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी साॅफ्ट लोन देऊ केले. या कर्जाचा हाप्ताच २५ कोटी रुपये असेल, तो मनपाला कधीही भरणे जमणार नाही,असे असताना शहराला तीन महिन्यात पाणी देण्याची बाता मारणारे भाजप नेते हे खोटे बोलत असल्याचा आरोप आ.दानवे यांनी केला. उद्धवसेनेला मतदान म्हणजे एमआयएम ला मदत, असा आरोप शिंदेसेेनेचे आ. संजय शिरसाट यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, मुस्लीम समाजाची मते महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाली होती. अशीच परिस्थिती आताच्या निवडणुकीत आहे. यामुळे मुस्लीम समाजाची मते महाविकास आघाडी ऐवजी एमआयएम जावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. खरे तर एमआयएम हे शिंदेसेना आणि भाजपसाठीच काम करीत आली आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या जिल्ह्यात तीन सभापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे आ.दानवे यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता कन्नड येथे तर १५ रोजी सकाळी ११ वाजता सिल्लोड येथे सभेचे आयेाजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.