मुंबई - राज्यात २० जून ला विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंड करून वेगळी चूल मांडली. शिंदे यांच्या बंडात औरंगाबाद जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे सहभागी झाले होते. गुवाहाटी, गोवा ते मुंबई आणि गव्हर्मेंट असा प्रवास करून शिंदे यांनी भाजपाच्या सहाय्याने नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, सोमवारी विश्वासमत जिंकल्यानंतर बंडखोर आमदार आपल्या मतदार संघात परतत आहेत. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट आज आपल्या मतदारसंघात परतले. त्यानंतर, त्यांनी आपल्या बंडाचं कारण आणि राजकारण दोन्हीही सांगितलं.
आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. भरपावसात आमचे कार्यकर्ते आम्हाला नेण्यासाठी, स्वागतासाठी आल्याचे सांगत त्यांनी आम्ही आजही शिवसैनिकच असल्याचं म्हटलं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता, आम्हीच त्यांना हा बंड करायला लावलं, असेही ते म्हणाले. यावेळी, त्यांनी पक्षनेतृत्त्वार आणि त्यांच्याजवळील काही लोकांचा चांडाळ चौकटी म्हणत चांगलाच समाचार घेतला. तर, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला.
माझ्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मला एक फोन नाही केला. माझ्या मतदारसंघात सोडा, पण माझ्या घराच्या बाजुला पालकमंत्री येतात आणि मला माहितीही होत नाही. माझ्या मतदारसंघासाठी 1 कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात 11 कोटींचा निधी मिळतो, हे कसं, असा सवालही संजय शिरसाट यांनी औरंगाबादेत असताना उपस्थित केला. तसेच, हे मी तोंडी बोलत नसून रेकॉर्डवर आहे सगळं, असेही ते म्हणाले.
संदीपान भुमरेंचीही सोमवारी स्वागत
सोमवारी सायंकाळी पैठणचे आमदार संदीपान भुमरे औरंगाबादला आले. विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षाने आम्हाला मोठे केले, हे खरे. मात्र, मी देखील थेट आमदार झालो नाही. पक्ष वाढीसाठी मी ३५ वर्ष दिले आहेत. लाठ्याकाठ्या अंगावर झेलल्या. अनेक केसेस झाल्या. तरीही डगमगलो नाहीत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमुळे मला सर्वकाही मिळाले. माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मंत्री झाला, असेही भुमरे यावेळी म्हणाले.
मंत्रिमंडळाचा अधिकार एकनाथ शिंदेंना
मंत्रिमंडळावर अद्याप चर्चा झालेली नाही, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांमध्ये मंत्रीपदावरून काही वाद नाहीत, मला वगळले आणि संजय शिरसाट यांना मंत्री केले तरी माझी हरकत नसेल. मी मंत्री होतो तेव्हा शिरसाट माझ्यासोबत होते, ते मंत्री झाले तर मी सोबत असेल, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली. बंडखोरीनंतर भुमरे आज सायंकाळी औरंगाबादला परतले.