- बाबासाहेब धुमाळवैजापूर : वैजापूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही सेनेत सरळ लढत होत असून, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश बोरनारे हे एक लाख मताने विजयी झाले होते. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर बोरनारे हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले होते. बोरनारे यांनी पाच वर्षांच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लावल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांच्या ताब्यात १५ वर्षांपासून वैजापूर नगरपालिका आहे. त्यांची वैजापूर शहराच्या राजकारणावर पकड आहे. या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून १० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात प्रहार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहणार का?वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून सेनेच्या दिवंगत आर. एम. वाणी यांनी तीन वेळा व रमेश बोरनारे यांनी एका वेळा विजय संपादन केला आहे. यावेळी मात्र भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी बंडखोरी केल्याने बोरनारे यांची वाट बिकट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन सेनेतील लढतीत भाजपचे बंडखोर पवार हे कोणासाठी फायद्याचे, तर कोणासाठी नुकसानीचे ठरतात, हे निवडणूक निकालाअंती समजणार आहेत.
निवडणुकीतील उमेदवाररमेश नानासाहेब बोरनारे (महायुती), दिनेशसिंग पद्मसिंग परदेशी (महाविकास आघाडी), जे.के. जाधव (प्रहार जनशक्ती पक्ष), संतोष भाऊराव पठारे (बहुजन समाज पार्टी), विजय देवराव शिनगारे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), किशोर भिमराज जेजुरकर (वंचित बहुजन आघाडी), एकनाथ खंडेराव जाधव (अपक्ष), प्रकाश रायभान पारखे (अपक्ष), ज्ञानेश्वर एकनाथ घोडके (अपक्ष), शिवाजी अरुण गायकवाड (अपक्ष)