औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विभागात व्हेंटीलेटर, ऑक्सिजन सुविधांसह कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना भाजपच्या सर्व खासदारांना गेल्या आठवड्यात केल्या होत्या; परंतु ही व्यवस्था तातडीने उभारणे शक्य नसल्याचे भाजपाच्या एका अंतर्गत बैठकीत ठरल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.
सर्व सुविधांसह कोविड हॉस्पिटल अथवा केअर सेंटर उभारण्याची जबाबदारी कुणी घ्यायची, मनुष्यबळ, यंत्रणा उभारण्यात अनेक अडचणी असल्यामुळे औरंगाबादमध्ये तरी हा निर्णय गुंडाळण्यात जमा झाल्याची चर्चा भाजपाच्या गोटात आहे.
मराठवाड्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून, मृत्यूदरदेखील वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ण विभागात जिल्हानिहाय सरकारी यंत्रणेसोबत भाजपाच्या टास्क फोर्सने स्पर्धा करावी. प्रत्येक जिल्ह्यात ५० किंवा १०० खाटांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सुविधेसह तीन कोविड सेंटर सुरू करावेत. या सेंटरमध्ये नाममात्र दरात कोरोना रुग्णांवर उपचार करावेत. अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाडा भाजप खासदारांच्या ऑनलाइन बैठकीत केल्या होत्या. खा.डॉ.भागवत कराड यांच्यावर मराठवाडा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विभागातील सर्व खासदार बैठकीला उपस्थित होते.
सेंटरच्या जबाबदारीवर होईना एकमत
पुढील काही महिने कोरोना हेल्पलाइनच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे नियोजन केले आहे. ऑक्सिजन, अन्नधान्य, इंजेक्शन, औषध पुरवठा करण्यासाठीदेखील भाजपच्या सर्व विभागीय फळीने काम करावे, अशा सूचना केंद्रीय पातळीवरून करण्यात आल्या आहेत; परंतु मनुष्यबळ, कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे डॉक्टर, मनुष्यबळ सध्या उपलब्ध होणे अवघड आहे. त्यातच सेंटरची जबाबदारी कुणी घ्यायची, यावरूनही स्थानिक भाजपा नेत्यांत एकमत नसल्याची माहिती समोर आली. एक खासदार, तीन आमदार अशी भाजपाची जिल्ह्यात ताकद आहे.