लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जेथे भाजपाचे पालकमंत्री आहेत, तेथे जोमाने विकासकामे होत असून ज्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, तेथे मात्र समाधानकारक कामे होत नसल्याचे सांगून शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर भाजपाचे नेते तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणीतील सभेत निष्क्रियतेचा ठपका ठेवल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.भाजपाच्या वतीने सोमवारी परभणी येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाजपाचे नेते तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. लोणीकर आपल्या भाषणात म्हणाले की, जेथे भाजपाचे पालकमंत्री आहेत, तेथे २०० ते ३०० कोटी रुपयांचा निधी आणून अनेक विकासकामे केली गेली. मी स्वत: जालन्याचा पालकमंत्री असल्याने जालन्यात २०० कोटी रुपये आणले. सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाºयांची आढावा बैठक घेतली असता परभणीची वाईट परिस्थिती निदर्शनास आली.जलयुक्त शिवार अभियानात जेथे भाजपाचे मंत्री आहेत, तेथे अत्यंत चांगले काम झाले. ढाळीचे बांध व इतर कामे चांगली झाल्याने जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला. परभणीत मात्र लूट झाल्याचे दिसून आले. अशीच परिस्थिती महावितरणच्या फिडरच्या संदर्भात आहे. जालना जिल्ह्यात आपण २२० केव्हीचे ४, १३२ केव्हीचे ४ व ३३ केव्हीचे ४९ उपकेंद्र मंजूर करुन आणले. परभणीत मात्र ३३ केव्हीचे फक्त तीनच उपकेंद्र मंजूर झाले आहेत. याच्यावरुन लक्षात घ्या, जेथे भाजपाचा पालकमंत्री तेथे कसा विकास होतो अन् जेथे शिवसेनेचा पालकमंत्री तो भाग कसा मागास होतो. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद वाढवा.आतापर्यंत या जिल्ह्यात भाजपाला शिवसेनेच्या कुबड्या का घ्याव्या लागल्या, याचा विचार करा. पालकमंत्र्यांच्या हातात २०० ते २५० कोटी रुपयांचा निधी नियोजन समितीच्या माध्यमातून खर्चासाठी उपलब्ध असतो. राज्यात, केंद्रात भाजपाची सत्ता आहे. परंतु, परभणीत आपला (भाजप) पालकमंत्रीच नाही, त्यामुळे काय उपयोग. त्यामुळे आता भाजपाची ताकद वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर निष्क्रियतेचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:26 AM