लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातुरात २९ ते ३० मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत असून, या संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ उद्घाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २९ मे रोजी सकाळी ९़३० वाजता होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक हभप विठ्ठल पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली़यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसकर, खा़डॉ़सुनील गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जि़प़ अध्यक्ष मिलिंद लातुरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, महापौर सुरेश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ यापूर्वी नाशिक, नवी मुंबई, शेळगाव, नांदेड व पुणे येथे संमेलने झाली़ आता लातूरमध्ये साहित्य संमेलन होत आहे़ २९ मे रोजी सकाळी ७ वाजता दिंडीने संमेलनाला सुरूवात होईल़ माजी मंत्री आ़ दिलीपराव देशमुख, आ़राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होणार आहे़ एकूण सात सत्रात होणाऱ्या साहित्य संमेलनात शेतकरी आत्महत्या रोखणे, स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, हुंडामुक्ती विवाह, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती आदी ज्वलंत विषयांवर परिसंवाद होणार आहेत़ साहित्य संमेलनाच्या समारोपाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव सुमित मलिक, आ़अमित देशमुख, महसूल आयुक्त, डॉ़चंद्रकांत दळवी, आयुक्त डॉ़ पुरूषोत्तम भापकर यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली़ पत्रपरिषदेला संमेलनाध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, दादा महाराज शिरवळकर, माधव महाराज शिवणीकर यांची उपस्थिती होती़
संत साहित्य संमेलनाचे अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Published: May 27, 2017 11:08 PM