औरंगाबाद : पैठण येथे विकासकामांचे उद्घाटन करताना जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे सादर केलेला माफीनामा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी फेटाळून लावला.
कोविड विषयक सुमोटो याचिकेची सध्या खंडपीठात सुनावणी सुरु आहे. गुरुवारीही या संदर्भात सुनावणी सुरु राहिली. राज्यात कोरोना प्रादुर्भावा रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू असताना मंत्री भुमरे यांनी पैठण तालुक्यातील देवगाव येथे ४ मी रोजी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व ग्रामस्थ जमवून विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. याबाबत छायाचित्रासह प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची खंडपीठाने गंभीर दखल घेऊन याबाबत काय कारवाई केली विचारणा सरकारी वकिलांना काल केली होती.
गुरुवारी सुनावणीदरम्यान रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात बिनशर्त लेखी माफीनामा सादर केला. मात्र, खंडपीठाने तो स्वीकारला नाही. तसेच दत्तात्रय गोर्डे यांनी भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्याची विनंती दिवाणी अर्जाद्वारे केली होती. तो अर्जही खंडपीठाने फेटाळला. परंतु गोर्डे यांनी काही अर्ज दिला तर पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई करावी, असे खंडपीठाने स्पष्ट केले.