छत्रपती संभाजीनगर : आईचे दूध हे नवजात शिशूंसाठी अमृत मानले जाते. मात्र, अनेक कारणांनी काही मातांना तान्हुल्यांना दूध पाजता येत नाही. मात्र, घाटीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात साकारण्यात आलेल्या मराठवाड्यातील पहिल्या मानवी दूध बँकेमुळे दररोज किमान २० शिशूंना आईचे दूध मिळणार आहे. यातून शिशूंना जगण्याचे बळही मिळेल.
रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद पश्चिम, कॅनडा व अमेरिकेतील रोटरी क्लब यांच्या माध्यमातून नवजात शिशू अतिदक्षता विभागात साकारण्यात आलेल्या मानवी दूध बँकेचे उद्घाटन सोमवारी प्रांतपाल स्वाती हेरकल, अध्यक्ष हबिब शेख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डाॅ. प्रसाद देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर, डाॅ. कानन येळीकर, नवजात शिशू विभागाचे डाॅ. अमाेल जोशी, डाॅ. अतुल लोंढे, रोटरीच्या स्वाती स्मार्थ, आनंद असोलकर, प्रकल्पप्रमुख हेमंत लांडगे, मुकुंद देशपांडे, सुहास वैद्य, मेट्रन संजीवनी गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी अमेरिकेहून नवजात शिशू विभागप्रमुख डाॅ. एल. एस. देशमुख, स्पेनहून बाॅब टेलर, मेडलीन किंग यांनी संवाद साधला. डाॅ. येळीकर, डाॅ. जोशी यांनी मानवी दूध बँकेतील कार्यपद्धतीवर माहिती दिली.
एका शिशूला दिवसभरात ३०० मिलि दूधएका नवजात शिशूला दिवसभरात किमान ३०० मिलि दुधाची आवश्यकता असते. नवजात शिशू विभागात रोज किमान २० शिशू दाखल होतात. त्यानुसार किमान ६ लिटर दुधाची गरज पडते. बँकेत ९ लिटर दूध पाश्चरायझेशनची क्षमता आहे. घाटीतील मातांची सर्व तपासणी होत असल्याने येथील मातांचे दूध संकलन केले जाईल. सर्व तपासणी करून शिशूला दूध दिले जाईल, अशी माहिती डाॅ. अमोल जोशी यांनी दिली.