छत्रपती संभाजीनगर : हज हाऊस राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शुक्रवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी दिला. जर्मनीला जाण्यापूर्वी ५ फेब्रुवारीला असा जीआरच काढला जाणार असल्याने हज हाऊसमध्ये राजकीय पक्षांच्या बैठका, खलबते वा अन्य कुठलेही उपक्रम राबविता येणार नाहीत. दोन एकरांत तब्बल ४२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हज हाऊसचे उद्घाटन करताना ते बोलत होते. येत्या काही दिवसांतच वक्फ बोर्डाचे कार्यालयही हज हाऊसमध्ये स्थलांतरित होणार आहे.
नारेगाव येथील वक्फच्या चाळीस एकरांत मुस्लिम समाजाच्या मुलांसाठी भव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचा संकल्पही सत्तार यांनी केला. आमखास मैदानावर भव्य स्टेडियम उभारण्यासाठी शंभर कोटी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच लेबर कॉलनीतील घरे पाडून मोकळ्या झालेल्या जागेत राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय उभारण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.
खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. उदयसिंग राजपूत, आ. प्रदीप जैस्वाल आदींची यावेळी संक्षिप्त भाषणे झाली. परंतु, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित नव्हते.
छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबईहून हजसाठी थेट विमान पकडल्यास त्यात माणसी ८० हजारांपेक्षा अधिक फरक पडत आहे. याचा आर्थिक भार पडत असून खासगी एअरलाईन्स कंपन्यांनी तो कमी करावा, यासाठी हा विषय मी लावून धरणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनीही हा विषय केंद्र सरकारकडे मांडण्याचा आग्रह सत्तार यांनी धरला. महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सीईओ इम्तियाज काजी यांनी प्रास्ताविक केले. सिडकोचे मुख्य अभियंता एन. बायस यांनी हज हाऊसमधील सुविधांची माहिती दिली. हज कमिटीचे चेअरमन एजाज खान यांचेही भाषण झाले. वक्फ बोर्डाचे सीईओ मु. ब. ताहसीलदार यांनी आभार मानले.
सोहेल झकीयोद्दीन यांनी संचालन केले. मौलाना हफिज जाकेर यांच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सिडकोचे मुख्य प्रशासक शंतनू गोयल, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत, प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, हज कमिटीचे सदस्य एजाज देशमुख, शकील काजी, नसीमा शेख, सलीम बागवान, आदींची मंचावर उपस्थिती होती.
यांचा पडला विसरपृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना व आरेफ नसीम खान अल्पसंख्याक मंत्री असताना २०१४ साली या हज हाऊसचे भूमिपूजन झाले होते. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. हज हाऊसचा लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी शहर काँग्रेसने शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. लोकार्पण सोहळ्यासाठी होत असलेल्या विलंबाविरुद्ध काँग्रेसचे कार्यकर्ते हमद चाऊस यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते; परंतु या गोष्टींचे लोकार्पण सोहळ्यात कुणालाच स्मरण राहिले नाही.