: जानकीदेवी बजाज फाउंडेशनचा पुढाकार
वाळूज महानगर : जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन फाउंडेशनचे सी. पी. त्रिपाठी व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१०) करण्यात आले.
कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार अंबादास दानवे यांनी जानकीदेवी बजाज फाउंडेशनकडे वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. सामाजिक बांधिलकी जोपासत फाउंडेशनने प्रकल्प उभारण्यासाठी सहमती दर्शविली होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पाहणी करून हा प्रकल्प त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
सी. पी. त्रिपाठी, बजाज ऑटोचे अशोक पत्की, आमदार अंबादास दानवे, जि.प. अध्यक्षा मीना शेळके, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, वाळूजच्या सरपंच सईदाबी पठाण, माजी सभापती मनोज जैस्वाल आदींच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सरपंच पपीन माने, ग्रामविकास अधिकारी एस. सी. लव्हाळे, नंदू सोनवणे, आरोग्य सेवक सुनील म्हस्के आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
फोटो ओळ- वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जानकीदेवी बजाज फाउंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन करताना बजाज फाउंडेशनचे सी. पी. त्रिपाठी, जि.प. अध्यक्ष मीना शेळके, आमदार आंबादास दानवे, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, सरपंच सईदाबी पठाण आदी.
---------------------