सोयगाव तालुक्यात ॲक्टीव्ह रुग्ण शून्यावर
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. ग्रामीण भागात सध्या ६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी सोयगाव तालुक्यात सध्या उपचार घेणारा (ॲक्टीव्ह) एकही रुग्ण नाही. ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिली, तर तालुका कोरोनामुक्त होईल.
घाटीत २७ रुग्ण गंभीर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोनाच्या ४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील २७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. २१ रुग्णांची प्रकृती ही सामान्य आहे. घाटीत काेरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गंभीर अवस्थेत दाखल होणारे रुग्ण अधिक आहेत.
विनाअपघात सेवा देणाऱ्या
चालकांना २५ हजारांचे बक्षीस
औरंगाबाद : एसटी महामंडळातील ज्या चालकांची २५ वर्षे विनाअपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून २५ हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. सुरक्षित प्रवास हेच प्रमुख ध्येय असलेल्या एसटी महामंडळाकडून १८ जानेवारीपासून १७ फेब्रुवारीपर्यंत रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली.
क्रांती चौक रस्त्यावर
धोकादायक खड्डा
औरंगाबाद : दूध डेअरी चौकातून क्रांतीचौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. वेगाने जाणारी वाहने या खड्ड्यामुळे अचानक थांबविली जाते. त्यातून पाठमागून येणारी वाहने समोरच्या वाहनावर आदळण्याचा प्रकार होतो. याकडे लक्ष देऊन खड्डा तात्काळ बुजविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.