वाळूज महानगर : वाळूजआरोग्य केंद्राचे उद्घाटन ३० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी जवळपास साडे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, या केंद्रामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय थांबणार आहे.
वाळूज परिसरातील गरीब कामगार रुग्णांची उपचारासाठी परवड होत असल्यामुळे तत्कालीन जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल यांनी वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्यानंतर जि.प. प्रशासनाकडून केंद्र उभारणीस मंजुरी देण्यात आली.
ग्रामपंचायतीने वाळूज-कमळापूर रस्त्यावर ३ एकर शासकीय जमीन यासाठी दिली. यासाठी शासनाकडून ५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्चून बांधकाम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे न भरल्यामुळे तसेच आवश्यक वैद्यकीय साधन-सामुग्री उपलब्ध होत नसल्यामुळे या केंद्राचे उदघाटन रखडले होते.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी या आरोग्य केंद्रातील फर्निचरच्या खरेदीसाठी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना सीएसआर फंड देण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आरोग्य केंद्र सुरु करण्यास आडचण निर्माण झाली होती.
सदरील आरोग्य केंद्र सुरु करण्यात यावे, यासाठी लोकमतने वेळोवेळी सविस्तर वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.