लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अर्थात घाटीत रुग्णालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातील पहिल्या वार्धक्यशास्त्र विभागाचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. रघुनाथ भागवत व आ. अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. नवी दिल्ली, चेन्नई नंतर देशातील हा तिसरा विभाग औरंगाबादेत सुरू झाला आहे.समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांच्या वतीने आलेल्या देणगीरूपी वस्तूंमुळे वार्धक्यशास्त्र विभाग शुक्रवारपासून कार्यरत झाला आहे. याचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. आर.बी. ऊर्फ रघुनाथ भागवत, अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ. अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, कर्करोग रुग्णालय विभागप्रमुख डॉ. अरविंद गायकवाड उपस्थित होते.ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. रघुनाथ भागवत म्हणाले की, ज्या शहरात दुर्मिळ प्रकारच्या शस्त्रक्रिया होत असे, तेथे आज मानवी अवयव प्रत्यारोपण केले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ही नेत्रदीपक प्रगती असून, वार्धक्यशास्त्राला आगामी काळात अधिक महत्त्व येणार आहे. या विभागात विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. यावेळी डॉ. भागवत यांनी डॉ. मंगला बोरकर यांना वार्धक्यशास्त्र विभाग सुरू केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी प्रास्ताविक करताना वार्धक्यशास्त्र विभाग सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याचा आढावा मांडला, तसेच या विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सध्या डॉ. महेश, डॉ. झेबा आणि डॉ. आशिष हे तीन विद्यार्थी मिळाले असून, त्यांच्या साहाय्याने या विभागाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजना व श्रावणबाळसारख्या योजनांचा लाभ व्हावा, यादृष्टीने शासनाने सहाकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी आ. सावे, डॉ. येळीकर, डॉ. कराड यांची भाषणे झाली.देणगीतून साकारला विभागसमाजातील दानशूर व्यक्तींनी वस्तूरूपी देणगी दिल्याने हा विभाग सुरू होऊ शकला आहे. ‘लोकमत’ने कपाट, सेल्फ या वस्तू या विभागास दिल्या, तर माजी मंत्री राजेंद्र दर्डा, डॉ. व्यंकट अय्यर, डॉ.धनेश्वर लांजेवार यांच्याकडून पार्टिशन भेट देण्यात आले. या विभागात रुग्णांना प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी नैसर्गिक चित्रे रेखाटली आहेत. मोडकळीस आलेल्या खाटा दुरुस्त करून त्या विभागात ठेवण्यात आल्या, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.वार्धक्यशास्त्र विभागात हे कार्य होणार६० वर्षांपुढील वय असलेल्या व्यक्तीला वैद्यकीय भाषेत वृद्ध संबोधले जाते. या व्यक्तींच्या आयुष्याची संध्याकाळ सुकर आणि सुखदायी व्हावी, यासाठी वार्धक्यशास्त्र विभागात औषधोपचार व समुपदेशन केले जाणार आहे.वृद्ध व्यक्तींना वयोमानानुसार विसरभोळेपणा, स्मृतिभ्रंश, हात थरथरणे, बडबड करणे, एकटेपणा, नैराश्य येणे आदी छोटे-मोठे आजार जडतात. अशा वृद्धांचे मानसिक समुपदेशन करून त्यांचे परावलंबित्व कमी करून स्वावलंबित्व वाढविण्यासाठी प्रयत्न जाणार केले आहेत.छोट्या-छोट्या बाबी स्वत: करण्यासाठी त्यांची मानसिकता तयार केली जाईल, तसेच मानसोपचार तज्ज्ञांचेही मार्गदर्शन त्यांना केले जाणार आहे.
औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात वार्धक्यशास्त्र विभागाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:27 AM
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अर्थात घाटीत रुग्णालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यातील पहिल्या वार्धक्यशास्त्र विभागाचे ...
ठळक मुद्देआगामी काळात वार्धक्यशास्त्र विभागाची अधिक गरज भासणार