नांदेड/ छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी धो- धो पाऊस कोसळला. शनिवार, रविवारपासून मराठवाड्यात धो-धो पाऊस कोसळत असून नदी, नाल्यांना पूर आला असून, धरणे, प्रकल्प तुडूंब झाली आहेत. पावसातच बळीराजाला पोळा सण साजरा करावा लागला. या पावसामुळे पिकांना फटका बसला, तर रबी पिके झालेले नुकसान भरून काढतील, अशी आशा आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे. मानवत (परभणी) तालुक्यातील वझुर बुद्रुक येथे मुक्कामी थांबलेली एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहत गेल्याची घटना सोमवारी घडली.
नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आल्याने बहुतांश गावांचाही संपर्क तुटला आहे. सर्वच धरणांत पाण्याचा येवा सुरू असल्याने नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांतील १६ प्रकल्पांचे तब्बल १७८ गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड सर्कल अंतर्गत लहान, मध्यम व मोठे असे एकूण ३१ प्रकल्प आहेत. यापैकी तब्बल निम्म्या प्रकल्पांचे म्हणजे १६ प्रकल्पांचे एकूण १७८ गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. गोदावरी, पैनगंगा, आसना नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत होत्या.
सिद्धेश्वर धरणाचे १४ गेट उघडण्यात आले आहेत. तर, नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि शहराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयाचे सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १२ गेट उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. गोदावरीनेही धोक्याची पाणीपातळी ओलांडली असून, नदीकाठच्या घरांसह परिसरातील गावांनाही प्रशासनाकडून अलर्ट जारी केला आहे.
प्रकल्पनिहाय उघडण्यात आलेले गेट असेअपर मानार प्रकल्प ६ गेट उघडले, ढालेगाव बॅरेज ९ गेट, तासगाव ११ गेट, मुद्गल ९ गेट, दिग्रस ४ गेट, अंतेश्वर ४ गेट, आमदुरा प्रकल्प ११ गेट, बळेगाव प्रकल्प १३ गेट, बाभळी प्रकल्प १४ गेट, मंगरूळ बॅरेज १३, येंडा भारवाडी १२ गेट, मोहपूर १२ गेट, सकुर १२, तर दिगाडी प्रकल्पाचे १२ गेट उघडण्यात आले आहेत. याप्रमाणे सोमवारी दुपारपर्यंत एकूण १७८ गेटमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटलामराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे संपर्क तुटला होता. या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली. नांदेडात गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. परिणामी नदीकिनारी काही भागांत पाणी शिरले होते. गोवर्धन घाट स्मशानभूमी पूर्ण पाण्याखाली गेली होती. नांदेड जिल्ह्यात रविवारी झालेल्या पावसाने १२ जनावरे दगावली होती. तर जवळपास ३५ घरांचे नुकसान झाले होते.
बीडमध्ये ११ ठिकाणी घरांची पडझडबीड : जिल्ह्यात ६१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तसेच दिवसभरात झालेल्या संततधारेमुळे ११ ठिकाणी घरांची पडझड झाली, तर दोन ठिकाणी दोन जनावरे मयत झाली. जिल्ह्यात सलग १२ तास पाऊस झाल्यामुळे पाटोदा ४, आष्टी १, परळीत ५ वडवणी १ अशा एकूण ११ ठिकाणच्या घरांची पडझड झाली, तसेच पावसामुळे आष्टी दोन जनावरे तर पाटोद्यात एक असे एकूण तीन जनावरे मयत झाली. दरम्यान, बीड शहरातील अंकुशनगर भागातील करपरा नदी परिसरात सोमवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले असून, शहरातील दगडी पुलावरून पाणी गेले आहे.
धाराशिवला १४ मंडळांमध्ये अतिवृष्टीधाराशिव जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पावसाची झड लागली आहे. रविवारी दिवसभर विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी सकाळी १०:२४ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात १४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
जालना जिल्ह्यात १०७ मिमी पाऊसजालना जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत तब्बल १०७.३ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील २९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून, प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे.
लातूर जिल्ह्यात सहा तालुक्यांत अतिवृष्टीलातूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील दहापैकी सहा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नद्या, नाले, ओढ्यांना पाणी आले. सोमवारी सकाळी ८:०० वाजेपर्यंत जिल्ह्यात मागील २४ तासांत ६८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.