औरंगाबाद: आयकर विभागाने बुधवारी राजस्थानमधील ‘मिड डे मिल्क’ बिझिनेस ग्रुपवर छापा टाकला. याची साखळी औरंगाबादपर्यंत येऊन पोहोचली. येथेही उद्योजक सतीश व्यास, मिथुन व्यास, गौरव व्यास या तिघांच्या निवासस्थानी व कार्यालयांवर छापे घातले. ही झाडाझडती दोन ते तीन दिवस चालण्याची शक्यता आहे.
पुणे येथून सकाळी सात वाजता विविध वाहनांमधून आयकरचे ५६ अधिकारी ज्योेतीनगर, न्यू एसबीएच कॉलनीतील सतीश व्यास यांच्या ‘शामा निवास’ या बंगल्यावर धडकले. दुसरे पथक पानदरिबा येथील त्यांच्या कार्यालयात व घरी अशा तीन ठिकाणी तीन पथके व्यवसायाच्या संदर्भातील विविध कागदपत्रांची, बँक खात्यांची कसून चौकशी करीत होती. मिड डे मिल्क घोटाळ्यासंदर्भात छापा टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सतीश व्यास यांच्या बंगल्यावर सीआरपीएफचे चार जवान तैनात करण्यात आले होते. व्यास परिवार शिवसेनेशी संबंधित असल्याने या छाप्यासंदर्भात राजकीय बाजूने चर्चा सुरू होती. शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांवर छापे टाकण्यात येत आहेत, अशी चर्चा होती. सतीश व्यास यांच्या बंगल्यावर आयकरची छाप पडली, ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या बंगल्याबाहेर गर्दी केली.
पानदरिबा येथे व्यास परिवाराचे कार्यालय आहे, तिथे आयकर विभागाच्या पुण्याहून आलेल्या चार कार उभ्या होत्या. दोन-तीन अतिरिक्त अधिकारी येथील जागृत हनुमान मंदिरात बसून होते. हे अधिकारी हिंदी भाषिक होते. यासंदर्भात आयकर विभागाच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनाही खबर नव्हती.