औरंगाबाद : करचुकवेगिरी, गैरव्यवहाराच्या संशयावरून आयकर विभागाने शिवा ट्रस्ट ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांवर मंगळवारी (दि.२५) एकाचवेळी छापे टाकले. यात महाविद्यालयांमध्ये एकूण विद्यार्थी, घेतलेले डोनेशन, खर्च आदींच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यात सुमारे २० कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला.
१९९८ मध्ये शिवा ट्रस्टची स्थापना झाली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार आहेत. या संस्थेचे औरंगाबाद व श्रीरामपूर परिसरात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, नर्सिंग स्कूल, पॉलिटेक्निक कॉलेज, कॉलेज आॅफ फार्मसी आदी शैक्षणिक संस्था व रुग्णालये चालविली जातात. मंगळवारी सकाळी १० वाजता आयकर विभागाच्या औरंगाबाद , अहमदनगर येथील ४० ते ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन्ही जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्थांमध्ये एकाच वेळी सर्व्हे सुरू केला. त्याचे नंतर छाप्यात रूपांतर करण्यात आले. संस्थेतील कर्मचाऱ्यांना बसवून ठेवण्यात आले होते.
जालना रोडवरील सेव्हन हिल येथील एका इमारतीत वरच्या मजल्यावरील कार्यालयात विद्यार्थ्यांना येऊ दिले जात नव्हते. आज कोणतेही लेक्चर होणार नाही, असे सांगितले जात होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आयकरचे अधिकारी, शैक्षणिक संस्थेत आजपर्यंत किती विद्यार्थ्यांचे अॅडमिशन झाले, त्यांच्याकडून किती डोनेशन घेतले. शासनाचा निधी मिळाला का, किती मिळाला, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्या वेतनावरील खर्च, संस्थेच्या उद्देशानुसार शैक्षणिक संस्था सुरू आहे का, आयकराचा किती भरणा केला, विविध बँक अकाऊंट आदींची तपासणी केली जात होती. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. आणखी एक ते दोन दिवस तपासणी सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष दिल्लीत शिवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार मंगळवारी दिल्लीत होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. ते शहरात आल्यावर त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मागील दोन महिन्यांतील दुसरी मोठी कारवाई बेहिशेबी मालमत्ता व करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाने शहरातील एका आॅईल मिलसह अन्य दोन बांधकाम व्यावसायिक, एका मोठ्या उद्योग समूहाच्या आर्थिक व्यवहाराची २१ आॅगस्ट रोजी तपासणी सुरू केली होती.या उद्योगाच्या संबंधित देशभरातील ८० संस्था, कंपन्यांची चौकशी करण्यात आली. सलग चार दिवस ही मोठी कारवाई सुरू होती. त्यानंतर मंगळवारी शिवा ट्रस्टच्या सर्व शैक्षणिक संस्थांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मागील दोन महिन्यांतील आयकर विभागाची ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.