औरंगाबाद : आयकर विवरणपत्र भरण्याच्या अखेरच्या तारखेला देशभरातून ताण वाढल्याने आयकर विभागाची वेबसाईट हँग झाली. त्यामुळे ‘सीएं’चे संपूर्ण कामकाज कोलमडले.
आर्थिक वर्ष २०१९-२०२०चे विवरणपत्र भरण्याचा ३१ मार्च हा अखेरचा दिवस होता. यामुळे ऑनलाईन विवरणपत्र भरण्यासाठी सीए, करसल्लागारांकडे सकाळपासूनच लगीनघाई सुरू होती. सकाळी आयकरची वेबसाईट सुरू होताच कामाला जोरदार सुरुवात झाली. पण देशभरातून ताण वाढल्याने दुपारपासून वेबसाईट हँग होणे सुरू झाले, अशी परिस्थिती रात्रीपर्यंत होती.
त्यात आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याची अखेरची तारीखही ३१ मार्च होती. त्याचाही वेबसाईटवर ताण वाढला व संपूर्ण सिस्टीम कोलमडली. आयकरची वेबसाईट ही जीएसटीएन पोर्टलप्रमाणेच सक्षम आहे हे सिद्ध झाल्याच्या कॉमेंट व्हॉट्सअप व फेसबुकवर सुरू झाल्या होत्या. याद्वारे आपला संताप व्यक्त केला जात होता.
सीए रोहन आचालीय यांनी सांगितले की, दुपारपासून आयकरची वेबसाईट हँग होत राहिली. दिवसभरात आमच्याकडील फक्त २० टक्के विवरणपत्र भरण्यात आली. आधारकार्ड - पॅनकार्ड लिंक करण्यासाठी कोणाला वेळच मिळाला नाही. ते काम ठप्प पडले होते. मात्र, आधार व पॅन लिंकची मुदत वाढविण्यात आली, ही बातमी सायंकाळी कळली.