दौलताबाद : माळीवाड्यात गुरुवारी सोनाली किरण साठे (२१) या महिलेचा खून झाला होता. हा खून सोनाचा पती किरण अशोक साठे यानेच केल्याचा आरोप मयताच्या सासरकडून करण्यात आला होता. तेव्हापासून किरण गायब होता; परंतु रविवारी त्याचे प्रेत दौलताबाद परिसरातील मेमबत्ता तलावात आढळून आल्याचे गावात एकच खळबळ उडाली आहे.
माळीवाड्यात गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री सोनाली साठेचा घरात संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला होता. तिचा खूनच झाला असून, तो पती किरण साठेनेच केल्याचा आरोपा सोनालीच्या परिवाराकडून करण्यात आला होता. शुक्रवारी शवविच्छेदन झाल्यानंतर सोनालीवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तेव्हापासून किरण साठे गायब होता. मात्र, रविवारी दौलताबाद भागातील मोमबत्ता तलावात सायंकाळी एका इसमाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती अब्दीमंडीचे उपसरपंच इस्मालन पठाण यांनी पोलिसांना कळवले. यानंतर दौलताबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक आरिफ शेख, रवी कदम, रफीक पठाण, शरद बच्छाव, प्रभाकर पाटेकर यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने अग्निशमन दलाल पाचारण केले. काही वेळानंतर प्रेत पाण्यातून बाहेर काढत पोलिसांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यादरम्यान पोलिसांनी प्रेताची ओळख पटविण्यासाठी किरण साठेच्या कुटुंबीयांना घाटीत बोलावले होते. त्यांनी हे प्रेत किरणचेच असल्याचे सांगत हंबरडा फोडला.
अधुरी प्रेमकहाणीसोनाली आणि किरण साठे हे माळीवाडा येथील रहिवासी आहेत. एकाच गावात राहत असल्याचे त्यांचे सूत जुळल्याने त्यांनी सतरा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, घरात कायम कुरकुर होत असल्याने त्यांच्यात नेहमी खटके उडत असल्याने त्यांच्यात वाद होत. शेवटी या वादाचा शेवट दोघांचा जीव गेल्यावर झाला, असेच म्हणावे लागेल. सोनाली आणि किरण यांना किशू नावाचा मुलगा आहे.
समाजमाध्यमांवर क्लिप ‘व्हायरल’पती- पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये किरण साठे याने त्याच्या पुण्यातील मित्राला फोन करीत सोनालीला संपवले असल्याचा संवाद आहे. मी तिचा विषय आता संपवला असून, नेहमी वाद होत असल्याने मी वैतागलो होताे. मी खूप सहन केले; पण प्रकरण वाढतच होते. त्यामुळे तिला संपवले, आता आपून संपायचे, असे किरण या क्लिपमध्ये सांगत असल्याचा आवाज आहे. ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. मात्र, ही क्लिप किरणचीच आहे की नाही, यासंबंधी अद्याप पडताळणी झालेली नाही.