फुलंब्री : तालुक्यात गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णाची संख्या ३२ ने वाढली आहे. याला नागरिकांचा बेशिस्तपणा जबाबदार असून, प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही चिंतेची बाब असून, नागरिक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
फुलंब्री शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये होणारे लग्नसमारंभ, खाजगी कार्यक्रम याला कारणभूत आहेत, तसेच सार्वजनिक ठिकाणी फिरणारे नागरिक कोणतीही दक्षता न घेता विनामास्क फिरत आहेत. यालाही आळा घालणे आवश्यक आहे. तालुक्यात डिसेंबर २०२० मध्ये कोरोनाचे केवळ ७ संक्रमित रुग्ण होते. यात जानेवारी महिन्यात १३ ने वाढ झाली. फेब्रुवारीमध्ये आणखी १० ने वाढ झाली, तसेच गेल्या सहा दिवसांत ही संख्या आणखी १७ ने वाढली आहे. दहा दिवसांत ३२ कोरोना रुग्ण वाढलेले आहेत. सद्य:स्थितीत तालुक्यात ४० रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण घाटी रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, तर काही कोविड सेंटरमध्ये आहेत, तर चार रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली होती. याची फारसी दखल नागरिकांनी घेतलेली नाही. परिणामी, रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वत:ची काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले यांनी केले.