औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येपाठोपाठ मृत्यूचे प्रमाणही आता कमी होत आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाच्या ३८ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील १६ तर ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना, दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकच कहर पाहायला मिळाला. मृत्यूचे प्रमाणही अधिक राहिले. महिनाभरापूर्वी दिवसभरात पाच ते सहा रुग्णांचा बळी जात होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचाही आलेख घसरला आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ४३७ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार ४९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १० आणि ग्रामीण भागातील ५८ अशा ६८ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागांतील ४५४ रुग्णांवर तर शहरात अवघ्या ४६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना, शेवगा, करमाड येथील ५५ वर्षीय पुरुष, नांदराबाद, खुलताबाद येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण घाटी २, टिळकनगर १, एन-५, सिडको १ यासह विविध भागांत १२ रुग्ण आढळले.
ग्रामीण भागातील रुग्ण
वाळूज एमआयडीसी १, दहिगाव १, आठेगाव खेडा १, हट्टी, विरगाव १, आंभई, सिल्लोड १ यासह विविध गावांत १७ रुग्णांची भर पडली.