नांदेड : आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी वसतिगृह सुविधेपासून वंचित होते़ नांदेड जिल्ह्यासाठी १९५ वाढीव जागांना आदिवासी विकास आयुक्तांनी मंजुरी दिल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिली़ शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी आदिवासी विकास आयुक्तालयाकडून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती़ नाशिक, ठाणे, अमरावती या प्रादेशिक विभागातील शासकीय वसतिगृहासाठी असलेली मंजूर प्रवेश क्षमता पूर्णपणे वापरात आणली होती़ परंतु, नागपूर प्रादेशिक विभागातील शासकीय वसतिगृहातील प्रवेश डिसेंबर २०१५ अखेरच्या अहवाल पाहता एकुण संख्येपैकी १ हजार ३२० जागा शिल्लक असल्याचे निदर्शनास आले़ अमरावती प्रादेशिक विभागातील नांदेड येथे जिल्हास्तरावर मुलांचे व मुलींचे वसतिगृहात प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी २३ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरु केले होते़ प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याने आंदोलनाची तिव्रता वाढली होती़ त्याची दखल घेत नांदेड येथे जिल्हास्तरावर मुलांसाठी १५० व मुलींसाठी ४५ अशा एकुण १९५ वाढीव जागांची मागणी किनवट येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली होती़ नागपूर प्रादेशिक विभागातंर्गत रिक्त असलेल्या १ हजार ३२० जागापैकी १९५ जागा नांदेड येथील मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी २०१५-१६ या वर्षाकरीता तात्पुरत्या स्वरुपात आदिवासी विकास आयुक्तांनी मंजूर केल्या़ तसे पत्र किनवट येथील प्र्रकल्प कार्यालयास प्राप्त झाले आहे़
आदिवासी वसतिगृहासाठी वाढीव १९५ जागांना मंजुरी
By admin | Published: February 18, 2016 11:39 PM