औरंगाबाद : घाटीत प्रत्येक गंभीर रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. येथे गंभीर रुग्णांना नाकारले जाते, असे होता कामा नये. घाटीची प्रतिमा मलीन होऊ नये. यासाठी खाटांची संख्या वाढवा. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना मनपाच्या काेविड केअर सेंटरला पाठवा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घाटी प्रशासनाला केली.
घाटीत अधिष्ठातांच्या कक्षात बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत केंद्रेकर यांनी या सूचना केल्या. बैठकीस महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे, प्रभारी अधिष्ठाता डाॅ. कैलास झिने, डाॅ. सुधीर चौधरी, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य आदींची उपस्थिती होती. बैठकीनंतर सुनील केंद्रेकर, अस्तिक कुमार पाण्डेय यांनी पीपीई किट घालून सुपर स्पेशालिटी ब्लाॅकमध्ये पाहणी केली. याठिकाणी जास्तीचे बेड कसे वाढविता येईल, यासंदर्भात सूचना केल्या. घाटी प्रशासनास मदत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी व त्यांचे सहाय्यक म्हणून एक तहसीलदार यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.