- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : तणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे किंवा लहान- मोठ्या अपयशाने खचून गेल्यामुळे नैराश्याने घेरले जाऊन अनेक लोक थेट आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. बदललेल्या कुटुंब व्यवस्थेपासून ते प्रत्येक क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे निर्माण होणारा ताण यासारख्या अनेक कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असून, याला प्रतिबंध म्हणून आणि याविषयी जागृती व्हावी म्हणून १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आत्महत्या करण्याचे प्रमाण भारतामध्येही प्रचंड वाढले आहे. टाळता येणाऱ्या गोष्टीतून मृत्यू या प्रकारात भारतात रस्त्यांवरील अपघातातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त असून, दुसऱ्या क्रमांकावर आत्महत्या हे कारण आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने २००६ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आत्महत्येचे प्रमाण एका तासात १३ आत्महत्या एवढे होते. तसेच याच संस्थेने २०१५-१६ साली देशात झालेल्या आत्महत्यांचा आकडा २.५७ लाख एवढा नोंदविला आहे. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जवळपास ३७ टक्के आहे. जागतिक स्तराचा विचार केल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात ८ लाखांपेक्षाही अधिक लोक वर्षभरात आत्महत्या क रतात.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. रश्मीन आचलिया म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात महिलांच्या आत्महत्या होण्याचे प्रमाण हे एक लाख स्त्रियांमागे १६.४ एवढे, तर पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण एक लाख पुरुषांमागे २५ एवढे आहे. जगातील ७९ टक्के आत्महत्या या कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होत आहेत. नैराश्यातूनच सर्वाधिक ७० ते ८० टक्के आत्महत्या होत असून, स्क्रिझोफ्रेनिया, बायपोलर डिसॉर्डर या मनोविकारांतूनही आत्महत्या होतात. ही सर्व आकडेवारी चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
महिलांचे प्रमाण कमीआत्महत्यांची आकडेवारी पाहिल्यास भारतामध्ये महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी आहे. याचे कारण म्हणजे भारतात अजूनही कुटुंबाचा आर्थिक भार हा बहुतांश वेळा पुरुषांवर असतो. ‘मेल इगो’ आड येऊन त्यातून होणारी घुसमट नैराश्य आणते आणि त्याचा शेवट आत्महत्या करण्यात होतो. व्यसनाधीनतेमुळेही अनेकदा नैराश्य येते आणि आत्महत्या केल्या जातात. तणाव सहन करण्याची ताकद तसेच कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला सांभाळून घेण्याची शक्ती महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण कमी आहे.भारतात पुरुषांपेक्षा महिलांच्या आत्महत्या कमी होत असल्या तरी जागतिक आकडेवारीत भारताचे स्थान चिंताजनक आहे. जागतिक क्रमवारीत महिलांच्या आत्महत्यांमध्ये भारत ६ व्या स्थानावर, तर पुरुषांच्या आत्महत्या या क्रमवारीत भारत २२ व्या स्थानावर आहे. हुंडाबळी, कौटुंबिक होणारे त्रास, नैराश्य, विवाहबाह्य संबंध या गोष्टींमुळे भारतातील बहुतांश महिला आत्महत्या करतात. परीक्षेतील अपयश, अभ्यासाचा ताण, प्रेम प्रकरणातील अपयश ही तरुणांमध्ये आत्महत्येची प्रमुख कारणे दिसून येतात.
कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवाउत्तम पालकत्व आणि कुटुंबाची योग्य साथ यामुळे पुढील पिढीतील आत्महत्यांचे प्रमाण निश्चितच कमी करता येईल. यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविणे, त्यांच्याशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये एक लकोंडेपणातून येणारे नैराश्य टाळता येईल. १५ ते ४४ वर्षे या वयोगटात सर्वाधिक आत्महत्या होत आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य आत्महत्येची धमकी देत असेल, तर ही गोष्ट गांभीर्याने घ्या, त्याच्या अडचणी जाणून घ्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करा.- डॉ. रश्मीन आचलिया