औरंगाबाद : रेल्वे आणि रेल्वेस्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्षभरात १०० च्या आत गुन्हे दाखल होत. परंतु हा आकडा आता ४०० वर पोहोचला आहे. एकीकडे गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे अपुर्या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांना रोखणे आणि तपास लावणे अवघड होत आहे.
रेल्वेस्टेशन आणि रेल्वेत प्रवाशांची कायम गर्दी असते. रेल्वे प्रवाशांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, त्याबरोबर गुन्हेगारी घटनांतही वाढ होत आहे. परंतु त्या तुलनेत लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांची संख्या, सोयी-सुविधा वाढत नाहीत. अवघ्या २० कर्मचार्यांवर लोहमार्ग पोलीस ठाण्याचा डोलारा उभा आहे. पूर्वी रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची सुटकेस, बॅग व इतर सामान पळविण्याच्या घटना होत असत. परंतु या घटना कमी झाल्या आहेत. आजघडीला प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन असतो. त्यामुळे अवजड बॅग, सुटकेस पळविण्यापेक्षा मोबाईल पळविण्याकडे चोरट्याचा कल वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
लोहमार्ग पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये ६५, २०१३ मध्ये ७८, २०१४ मध्ये ८२, २०१५ मध्ये १२०, २०१६ मध्ये १७६, तर २०१७ मध्ये तब्बल ४१५ गुन्ह्यांची नोंद झाली. गतवर्षी मोबाईल चोरीच्या २८५ घटना समोर आल्या. यातील २५ टक्के मोबाईल चोरीच्या घटनांचा तपास लागल्याचे सूत्रांनी सांगितले. तुलनेत ९४ बॅग चोरीचे प्रकार झाले. बॅग पळविणे अवघड जात असल्याने मोबाईल चोरीकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याचे दिसते. अकस्मात मृत्यूच्या ६४ घटना झाल्या.
कर्मचारी संख्या वाढवावीआकडेवारी पाहता गुन्ह्याच्या घटनेत वाढ झाली आहे. परंतु तरीही गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातात. कर्मचार्यांच्या संख्येत वाढ झाली तर त्यावर नियंत्रण आणण्यास मोठी मदत होईल. रेल्वेला बोगींची संख्या वाढली तर दारात बसून प्रवास करण्यातून निर्माण होणार्या घटनांनाही आळा बसेल.-दिलीप साबळे, निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे