औरंगाबाद : पावसाळा सुरू होताच गॅस्ट्रो, डायरिया आदी आजारांचे प्रमाण वाढते. सध्या पावसाळा उशिराने सुरू झाला तरी मागील महिनाभरात डायरियाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आतापर्यंत मनपाच्या ३२ आरोग्य केंद्रांमध्ये ८० पेक्षा अधिक रुग्ण डायरियाचे आढळून आले. अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे डायरिया होण्याची शक्यता असते. उघड्यावरील अन्नपदार्थही याला कारणीभूत ठरू शकतात. डायरियाचे प्रमाण लक्षात घेऊन मनपाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
आ. सतीश चव्हाण यांनी सोमवारी सकाळी विधान परिषदेत महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तातडीने आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीची माहिती आज देताना महापौरांनी नमूद केले की, पावसाळ्यात जागोजागी पाण्याची डबकी साचून त्याद्वारे डासांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होऊन डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांत वाढ होऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून शहराच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, यासाठी शहरभरात साथरोग डासांच्या नियंत्रणासाठी औषध फवारणी, धूर फवारणी, अॅबीट वाटप, साथरोगांपासून बचाव करण्यासाठी जनजागृतीची कामे नियोजन करून तात्काळ हाती घ्यावीत, अशी सूचना महापौरांनी केली. दरवर्षी औषध फवारणीविषयी अनेक वॉर्डांमधून तक्रारी येतात.
यंदा फवारणीची कामे प्रमाणिकपणे करा. यात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबी महापौरांनी दिली. या बैठकीला आरोग्य सभापती गोकुळ मलके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मलेरिया विभागप्रमुख अर्चना राणे, मनीषा भोंडवे, डॉ. मेघा जोगदंड, वडेरा आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
स्मार्ट सिटीतून सुविधा मनपाच्या काही रुग्णालयांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. आरोग्य केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, अनेक ठिकाणी तर स्वच्छतागृह नाहीत. स्ट्रेचर, व्हीलचेअरदेखील नाही. या आवश्यक सुविधा आता स्मार्ट सिटीतील स्मार्ट आरोग्य प्रकल्पांतर्गत २५ लाख रुपयांमधून पुरविण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
चेतनानगर येथे आरोग्य केंद्रनॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत मंजूर झालेले आठपैकी हर्सूल-चेतनानगर येथील आरोग्य केंद्र लवकरच सुरू होणार आहे. पालिकेला अद्यापही सातारा-देवळाईत आरोग्य केंद्र उभारण्यासाठी जागा मिळालेली नाही. त्यामुळे भाडेतत्त्वावर जागा घेऊन येथे आरोग्य केंद्र सुरू करण्याची सूचना महापौरांनी केली.