छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू झाल्यापासून सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागाबरोबर शहरातील वस्त्यांमध्येही साप आढळत आहेत. सापाने चावा घेतल्याच्या घटनाही समोर येत आहेत. एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले.
ग्रामीण भागात सापांचा वावर नवीन नाही. शेतात तसेच झुडुपांमध्ये साप हमखास असतातच. पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी गेल्याने ते बाहेर येतात आणि घरातील अडगळीच्या जागेत, जिन्याखाली दबा धरून बसतात. घरात झाडांच्या कुंड्या असतात. त्या दाटीवाटीने न ठेवता अंतरावर ठेवाव्यात. कारण, त्याच्या आडोशाला साप येऊन मुक्काम ठोकू शकतो. त्यामुळे अशा जागांकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक जण साप पकडण्याचा प्रयत्न करतात; परंतु असे धाडस जिवावर बेतू शकते.
३० जणांना चावला विंचूसर्पदंशाबरोबर विंचू चावण्याच्या घटना जिल्ह्यात होत आहेत. सापांबरोबरच विंचूचा दंशही घातक समजला जातो. गेल्या अडीच महिन्यांत ३० जणांना विंचू चावला.
घाटी रुग्णालयात उपचारजिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी घाटी रुग्णालयात येतात. यात सर्पदंश, विंचू दंशाचेही रुग्ण घाटीत येतात. गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या २७० रुग्णांनी येथे उपचार घेतले.
साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?साप चावल्यानंतर सुरुवातीचा एक तास तो रुग्णासाठी वेदनादायक असतो. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्या व्यक्तीला धीर द्यावा, अति चालणे, बोलणे टाळावे. जखम अगोदर जंतुनाशकाने, पाण्याने स्वच्छ करावी. स्वच्छ आवळपट्टी दंश झालेल्या जागेपासून एक फूट अंतरावर बांधावी. रुग्णास तत्काळ उपचारासाठी न्यावे. मांत्रिक व अंधश्रद्धेला बळी पडून उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.
विंचू चावला तर...विंचू चावला तर कोणत्याही घरगुती उपचारापेक्षा वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. आपल्याकडे काळा आणि लाल हे दोन प्रकारचे विंचू आढळून येतात. काळ्या विंचूचा दंश झाला तर असह्य वेदना होतात. मात्र, त्याने मृत्यू ओढवत नाही. उपचाराअंती या वेदना शमतात. लाल विंचवाचा दंश जीवघेणा ठरू शकतो. या विंचूला घातक समजले जाते.