औरंगाबाद : सहा महिन्यांच्या कालावधीपैकी चार महिने लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यक्ती घरात बंद होती. या कालावधीत किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडून प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याच्या घटना घडल्या. सासरच्या त्रासाला कंटाळलेल्या ५२२ महिलांनी पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये धाव घेतल्याचे समोर आले.
पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या कारणावरून भांडण होऊन प्रकरण पोलिसांपर्यंत जाते. मात्र, किरकोळ कारणावरून संसार मोडू नये याकरिता पोलिसांचा भरोसा सेल कार्यरत आहे. पोलीस ठाण्यात महिलेची जोडीदाराविरुद्ध अथवा पुरुषाची पत्नीविरुद्ध तक्रार आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल केला जात नाही. कौटुंबिक वादाची तक्रार भरोसा सेलकडे वर्ग केली जाते. भरोसा सेलचे अधिकारी, कर्मचारी तक्रारीचे स्वरूप पाहून पती-पत्नीला बोलावून घेते. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्यात तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा पती आई-वडिलांचे ऐकतो म्हणून पत्नी त्याच्याविरुद्ध पोलिसांत येते. अशावेळी त्यांना पुढील तारखेस बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाते. समुपदेशनाने पती-पत्नीमध्ये तडजोड होण्याचे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे.
गतवर्षी शहर पोलिसांना तब्बल १ हजार ८२६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यात पुरुषांच्या २३१ तक्रारी होत्या. यापैकी तुटण्याच्या मार्गावर असलेल्या ७०८ जोडप्यांचे संसार पोलिसांनी वाचविले, तर ५७९ तक्रारदारांनी आपसात तडजोड करून घेतली. २५५ तक्रारी पोटगी, संपत्तीच्या वाटणीसाठी न्यायालयात पाठविल्या होत्या, तर १६९ प्रकरणे पोलीस ठाण्याकडे गुन्हा नोंदविण्यासाठी वर्ग केली. यावर्षी जानेवारी ते जूनअखेर ५२२ महिलांच्या तक्रारी भरोसा सेलकडे आल्या. यापैकी १६२ जोडप्यांनी समुपदेशनानंतर तक्रार परत घेत एकत्र नांदावयाची तयारी दर्शविली.
जून-जुलैमध्ये वाढल्या तक्रारीलॉकडाऊन काळात संचारबंदी होती. यामुळे महिलांनी तक्रार करण्यासाठी पोलिसांत जाण्याचे टाळले होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच भरोसा सेलकडे येणाऱ्या तक्रारींचा ओघ वाढल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली. जून महिन्यात प्राप्त ८१ अर्जांपैकी १२ जोडप्यांची तडजोड करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले, तर जुलै महिन्यात प्राप्त ७३ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.