औरंगाबाद : दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करण्याचा कार्यक्रम माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने हाती घेतल्याची माहिती सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. यात परीक्षा केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया दहावी-बारावी बोर्ड परीक्षांना फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये सुरुवात होणार आहे. दरवर्षी विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. यंदाही मागील वर्षीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी विद्यार्थी संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये परीक्षा देणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८९ हजार ९९१ आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६७ हजार २१५ आहे. या अर्जांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असेही पुन्ने यांनी सांगितले. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढते आहे. मात्र, त्या तुलनेत असणारी चांगली आणि सुविधा देणाºया परीक्षा केंद्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर होणारी गैरसोय, पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांना खाली बसवणे, बाकडे नसणे आदी विविध समस्या आढळून येतात. असे प्रकार वारंवार होत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय बोर्डाच्याही कामकाजावर शंका उपस्थित होते. त्यामुळे सुविधा नसतानाही परीक्षा केंद्र स्वीकारणाºया शाळा-महाविद्यालयांची पाहणी केल्यानंतर परीक्षा केंद्र देण्याबरोबरच आता नव्याने परीक्षा केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. शिवाय परीक्षा केंद्र असलेल्या शाळा- महाविद्यालयांमध्ये सुविधा आहेत की नाही, यासंबंधी माहितीदेखील मागविण्यात आली आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थी संख्येत वाढ; परीक्षा केंद्रांची होणार फेरमांडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:06 AM