औरंगाबाद : नियमित पावसाळा सुरू होऊन ११ दिवस उलटले असून, औरंगाबाद विभागात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दुष्काळ उपाययोजनेत असलेली प्रशासकीय यंत्रणा हवालदिल झाली असून, उपाययोजनेबाबत विभागीय प्रशासनात चिंता वाढली आहे.
पाऊस लांबल्यामुळे टँकरच्या आकड्यात घट होण्याऐवजी वाढ होत आहे. खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. विभागात ५६ लाख ४१ हजार ९५ नागरिकांना ३ हजार ५०६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर औंरगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. ११७० टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू असून, १९ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ९७६ आणि जालना जिल्ह्यात ७०१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने ३० जूनपर्यंत टंचाईच्या अनुषंगाने तयारी केली असली, तरी पाऊस लांबला तर यंत्रणेला प्रशासकीय कामे बाजूला ठेवून उपाययोजनांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मराठवाड्यात सध्या २४६१ गावे तहानलेली आहेत. या गावांची तहान टँकरच्या पाण्यावरच आहे. आजवर विभागात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला असता, तर किमान टँकरचा आकडा तरी कमी झाला असता, अशी प्रतिक्रिया प्रशासनातून उमटत आहे. ५६९९ विहिरी अजूनही अधिग्रहित आहेत.
दुष्काळामुळे बदल्यांवर परिणामदुष्काळामुळे बदल्यांवर परिणाम होत आहे. तलाठ्यांच्या बदल्या रोखण्यासाठी गावांतील राजकारण्यांची शिष्टमंडळे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून विनंत्या करू लागले आहेत. विद्यमान तलाठ्यांच्या बदल्या आॅक्टोबरपर्यंत तरी करू नका, अशा मागण्या वाढू लागल्या आहेत.
हवामानतज्ज्ञ काय सांगतात?हवामानतज्ज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, राज्यासह मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात नियमित मान्सून सक्रिय होण्यासाठी १ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पूर्वमोसमी पाऊस हाच नियमित मान्सून असल्याचा समज होऊ शकतो. हा आभासी मान्सून आहे, त्यामुळे पेरण्यांचे सूत्र शेतकऱ्यांना लांबवावे लागेल.
विभागात आजवर किती पाऊस झालामराठवाड्यात ७ जूनपासून आजवर ७७९ मि.मी. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत १८.७ टक्के पाऊस झाला आहे. किमान ८७ मि.मी. पाऊस विभागात होणे अपेक्षित होते. २.१ टक्के इतका हा पाऊस आहे. १८ जून रोजी ०.११ मि.मी. पावसाची विभागात नोंद झाली आहे. १ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय झाला नाही तर पावसाचा मोठा खंड निर्माण होईल.