वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी उत्पादन उद्दिष्टात वाढ झाल्याने कामगारांना देण्यात येणाऱ्या दिवाळीच्या सुट्यांत यंदा कपात केली आहे. शनिवारपासून तीन दिवस औद्योगिक क्षेत्रात शुकशुकाट दिसून येणार आहे. दरवर्षी चार ते पाच दिवस देण्यात येणारी सुटी आता केवळ दोन वा तीन दिवसच मिळणार आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लॉकडाऊन केल्यामुळे उद्योगनगरीतील जवळपास ४ हजार कारखाने बंद होते. अनलॉकनंतर कारखाने सुरू झाले असून, उद्योगाची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येत आहे. मात्र, उत्पादनाचे उद्दिष्ट वाढले असून, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी कामगारांच्या दिवाळीच्या सुट्या कमी करण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी घेतला आहे. बजाज ऑटो कंपनीने शनिवारपासून सोमवारपर्यंत कामगारांना तीन दिवसांच्या सुट्या दिल्या आहेत. मंगळवारपासून कंपनीतील कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होणार आहे. गुडईअर कंपनीने १४ व १५ नोव्हेंबर अशी सुटी दिली असून, १६ नोव्हेंबरपासून कंपनी सुरू होईल. याच बरोबर औद्योगिक क्षेत्रातील इतर लहान-मोठ्या कंपन्यांकडून कामगारांच्या दिवाळी सुटीत कपात करण्यात आली आहे.