संतोष हिरेमठ
औरंगाबाद : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. परंतु आजही महिलांची प्रसूती घरीच होणे थांबलेले नाही. घरीच प्रसूती होण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत कोरोना काळात आणखी वाढ झाली असल्याचे समोर आले.
औरंगाबादआरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १२१ महिलांची प्रसूती घरीच झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत चारही जिल्ह्यांची मिळून प्रसूतींची संख्या केवळ ६७ होती, अशी माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली.
या ४ जिल्ह्यांपैकी हिंगोलीत गेल्या ५ महिन्यांत घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. घरीच प्रसूती होण्यात चार जिल्ह्यांत हिंगोली पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ४२ महिलांची प्रसूती घरीच झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद आणि जालना आहे. प्रत्येकी ३८ महिलांची प्रसूती या दोन्ही जिल्ह्यांत घरीच झालेली आहे. घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण परभणीत सर्वाधिक कमी आहे.
काय आहे कारणे...
लॉकडाऊन काळात वेळीच वाहतुकीची सुविधा उपलब्ध न होणे, तीव्र प्रसूती कळांमुळे रुग्णालयात जाण्याची तयारी होतानाच घरीच प्रसूती होणे, त्याबरोबर कोरोनाच्या भितीपोटी रुग्णालयात जाण्याचे टाळून घरीच प्रसूती होण्यास प्राधान्य दिल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.
घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण-
एप्रिल ते ऑगस्ट -२०२०- औरंगाबाद- ३८ , जालना - ३८, परभणी - ३, हिंगोली- ४२
घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण-
एप्रिल ते ऑगस्ट -२०१९ - औरंगाबाद- २४, जालना - ७, परभणी - ४, हिंगोली- ३२