औरंगाबाद : केंद्र सरकारने हमीभावात केलेली वाढ व दुसरीकडे मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती या दोन्हीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्यास सुरुवात झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, उडीद डाळ व हरभरा डाळीच्या भावात वाढ झाली आहे.
चालू खरीप हंगामात पिकणाऱ्या शेतीमालासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव (एमएसपी) देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णय मागील महिन्यात केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार मूग ६९७५ रुपये, उडीद डाळ ५६०० रुपये व तूर डाळीचा हमीभाव ५६७५ रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. परिणामी, बाजारपेठेत डाळीचे भाव वधारले. केंद्र सरकारकडे तूर व हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र, मराठवाड्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भाववाढीत आणखी भर पडली आहे. आता हळूहळू जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढू लागले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत २०० रुपयांनी महागून हरभरा डाळ ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. मराठवाड्यात तूर, मूग व उडदाचा पेरा चांगला झाला आहे. मात्र, पावसाने ताण दिल्याने सध्या पिकाबदल शाश्वती देता येत नाही. काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. यामुळे २०० ते ३०० रुपयांनी वधारून तूर डाळ ५४०० ते ६००० रुपये, मूग डाळ ६००० ते ७००० रुपये, उडीद डाळ ४६०० ते ५६०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. आता हमीभाव वाढल्याने शेतकरी खरिपातील मूग, तूर, उडीद कमी भावात विक्री करणार नाही. त्यात दुष्काळाच्या परिस्थितीने स्थानिकमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते; पण परराज्यात चांगला पाऊस झाला आहे. तेथील उत्पादनावर येथील डाळीच्या किमतीचे भविष्य ठरेल, अशी माहिती डाळीचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी दिली. येथील दुष्काळसदृश परिस्थिती आणखी १० दिवस अशीच राहिली व सरकारने गोदामातील तूर व हरभरा बाहेर आणला नाही, तर सणासुदीत भाववाढ होऊ शकते. गव्हापाठोपाठ ज्वारी, बाजारीत वाढ गव्हाचे व्यापारी जगदीश भंडारी यांनी सांगितले की, मध्यप्रदेश सरकारने बोनससह हमीभाव १९५० रुपये प्रतिक्विंटल देऊन शेतकऱ्यांकडून गहू खरेदी केला. परिणामी, २०० ते ३०० रुपयांनी गव्हाचे भाव वधारून सध्या २४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. त्यापाठोपाठ भाववाढ होऊन ज्वारी २२०० ते २६०० रुपये, तर बाजरीचा भाव १६०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचला आहे.