बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरात मल्चिंग पेपरवर लागवड केलेल्या हिरवी मिरचीला सध्या बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळेच की काय शेतकरी मिरची तोडणी न करता झाडालाच पिकू देत असून लाल मिरचीच्या उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. परंतु सततच्या पावसामुळे पिकलेली मिरची वाळवणीला टाकण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरची लागवड चांगली झालेली आहे. मिरचीला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा मावळली आहे. कारण गेल्या आठवड्यात बाजारपेठेत मिरचीला ४ ते १० रुपये किलोपर्यंत जेमतेम भाव मिळत गेला. तोडणीसाठी ६ रुपये किलो प्रमाणे मजुरी द्यावी लागली. त्यामुळे तोडणीचा देखील खर्च निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीची तोडणी बंद केली आहे. शेतकरी झाडालाच मिरची लाल होऊ देत आहेत. लाल मिरचीला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. लाल मिरचीला भाव मिळत असल्याने त्याकडे वळलो असल्याचे शेतकरी विठ्ठल फरफाडे यांनी सांगितले.