- ऋचिका पालोदकर
औरंगाबाद : बाहेरगावाहून ती औरंगाबादेत शिकायला आली होती त्यामुळे हॉस्टेलमध्ये राहायची. या शहरात तिचे कोणीही नातेवाईक नव्हते. अशातच एक मुलगा तिचा पाठलाग करू लागला. रोजच त्रास द्यायचा. ती वैतागून गेली. नवे शहर आणि हा असा त्रास पाहून घाबरून गेली; पण अनोळखी शहर, अनोळखी लोक अडचण सांगणार तरी कोणाला? या विवंचनेत ती अडकलेली. शेवटी आई-वडिलांना फोन केला आणि त्यांना अडचण सांगितली. आई-वडील त्वरेने इथे आले. त्या मुलाला दमदाटी केली; पण त्याने काहीही दाद दिली नाही. आपल्या मुलीची या प्रकारात नाहक बदनामी होऊ नये, म्हणून शेवटी त्यांनी मुलीला शिक्षण सोडून देऊन पुन्हा आपल्या गावी नेण्याची तयारी केली. अशातच या मुलीला ‘पोलीसदीदी’ची माहिती मिळाली. तिने त्यांचा आधार घेतला आणि त्या मुलाला चांगलाच धडा शिकविला. आज त्या मुलीची समस्या तर दूर झालीच पण ‘पोलीसदीदी’ची साथ मिळाल्यामुळे आत्मविश्वासही वाढला.
आज अडचणीत सापडलेल्या महिलांना आणि मुलींना पोलीसदीदींचा आधार वाटू लागला आहे आणि या दीदींच्या धाकामुळे रोडरोमिओंच्या हीरोगिरीलाही लगाम बसतोय. पोलीस उपायुक्त दीपाली धाटे-घाडगे यांनी दोन महिन्यांपूर्वी शहरात ‘पोलीसदीदी’ पथक सुरू केले. पोलीस निरीक्षक किरण पाटील यासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणा-या महिला पोलीस उपनिरीक्षक त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ‘पोलीसदीदी’ म्हणून ओळखल्या जातात.
शहरातील मुलींनी, महिलांनी अधिक बोलते व्हावे, त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्या मोकळेपणाने सांगाव्यात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मुलींच्या मनातून पोलिसांविषयीची भीती दूर व्हावी, या उद्देशाने हे पथक स्थापन करण्यात आले आहे. आपल्या हद्दीतल्या शाळा, कॉलेज किंवा क्लासेस सुटण्याच्या वेळेत त्या भागात गस्त वाढविणे, मुलींशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शाळा- महाविद्यालये- क्लासेस या ठिकाणी जाऊन मुलींना पोलीसदीदी पथकाची माहिती सांगणे, असे काम या उपक्रमांतर्गत पोलीसदीदींच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. अनेकदा मुली सगळ्यांसमोर तक्रार करायला, अडचणी सांगायला घाबरतात; पण फोनवर त्यांच्या अडचणी मोकळेपणाने बोलून दाखवितात, असेही काही पोलीसदीदींनी सांगितले.
समुपदेशनाचे तंत्राचा वापर एकतर्फी प्रेमातून किंवा आकर्षण म्हणून शाळकरी, महाविद्यालयीन तरुणींना त्रास देणारी मुले अनेकदा कमी वयाची असतात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविता येत नाही. त्यामुळे या मुलांसाठी आम्ही समुपदेशनाचे तंत्र अवलंबितो. यामध्ये मुलगा, मुलगी आणि त्यांचे दोघांचेही पालक यांना एकत्रित बसवून पालकांसमोरच मुलांना समज देण्यात येते. यातील अनेक घटना गंभीर नसतातही; पण पुढे जाऊन याच किरकोळ घटना उग्र रूप धारण करू नयेत, यासाठी पोलीसदीदी पथक कार्यरत आहेत. - किरण पाटील, पोलीस निरीक्षक
बचत गटातील महिलांनाही आधारआमच्या हद्दीत येणा-या बचत गटांनाही आम्ही कायम भेटी देतो. यामध्ये महिला त्यांच्या तक्रारी आमच्यापुढे मांडतात. अनेक जणींना दारुड्या नव-याकडून मारहाण सहन करावी लागते, अशा वेळी आम्ही त्यांच्या नवºयांना समज देतो, धाक दाखवितो. पोलीसदीदी उपक्रमांतर्गत आम्ही बचत गटातील महिलांचे आणि वसतिगृहातील रेक्टर्सचा समावेश असलेले व्हॉटस् अॅप ग्रुप तयार केले आहेत. या माध्यमातून त्यांच्या अडचणी आमच्यापर्यंत अधिक जलद पोहोचतात. या उपक्रमांतर्गत प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहेच; पण मुलींनीही अधिक बोलते होऊन त्यांच्या अडचणी धीटपणे मांडल्या पाहिजेत. - वर्षाराणी आजळे, पोलीस उपनिरीक्षक