छत्रपती संभाजीनगर : आज देशात संविधान नष्ट होत चालले आहे. बेरोजगारी एवढी वाढत असताना कुणी आवाज उठवायला तयार नाही. जाती- जातीचे व धर्मा- धर्माचे ध्रुवीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे बंधुभावही नष्ट होत चालला आहे आणि बंधुभावाशिवाय या देशाची प्रगती अशक्य आहे, असे रोखठोक प्रतिपादन शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी केले. याचवेळी ते म्हणाले की, संविधानाची भक्ती झाली पाहिजे आणि कुराण, गीता व गुरुग्रंथसाहिबासारखा दर्जा संविधानाला प्राप्त झाला पाहिजे.
कॉ. चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीतर्फे स्वातंत्र्यसेनानी कॉ. चंद्रगुप्त चौधरी व कॉ. करुणाभाभी चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘भारतीय संविधानिक नैतिकता, न्याय संस्था आणि लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर ते मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ बी.एच. मर्लापल्ले होते.
प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते चौधरी दाम्पत्याच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी, कॉ. समाधान इंगळे, कॉ. अमरजित बाहेती, नभा इंगळे, उमेश इंगळे यांनी क्रांतिगीते गायली. स्मृती समितीचे कॉ. भालचंद्र कानगो यांनी प्रास्ताविक केले. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर कॉ. देवीदास तुळजापूरकर यांनी आभार मानले.
दुष्यंत दवे यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे अनेक दाखले दिले व त्यांच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली. जणू १९७५ नंतर या देशात काय होणार याची जाणीव डॉ. बाबासाहेबांना त्यावेळी आली होती. देशात जी काही परिस्थिती उद्भवत आहे, त्याला नागरिक म्हणून आपणही जवाबदार असल्याचे दवे म्हणाले. संविधान म्हणजे देशासाठी कोड ऑफ कंडक्ट आहे. हा देश मुळातच अलोकशाहीवादी असल्याचे बाबासाहेब म्हणाले होते. ३६ टक्के मतदान घेतलेला पक्ष आमच्यासोबत सारा देश उभा असल्याचे सांगतात, हे हास्यास्पद आहे. औरंगजेबाच्या काळातही हिंदुत्व इतके धोक्यात नव्हते, असा टोला त्यांनी लगावला. प्रबळ विरोधी पक्षांशिवाय लोकशाही मजबूत होणार नाही. उपमुख्यमंत्रिपद हा घटनेचा विपर्यास आहे. तुम्ही आमच्याबरोबर आरोपमुक्त व्हा, असे राजकारण सध्या चालू आहे. निवडून आलेल्या लोकांना पक्षाशी फारकत घेणे सोपे झालेय, याकडे अध्यक्षीय भाषणात मर्लापल्ले यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.