करमाड: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर करावा या मागणीसाठी शेकटा ( ता.जि.छत्रपती संभाजीनगर) येथील जवळपास ३०० फुट उंच बीएसएनएल मोबाईल टॉवरवर चढून प्रहार जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी आज पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे.आरक्षण आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातही याच टॉवरवर चढून जवळपास ३० तासांचे उपोषण त्यांनी केले होते.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी सरकारला चाळीस दिवसाचा वेळ देण्यात आला होता. परंतु अद्यापही कुणबी प्रमाणपत्र देण्यात न आल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा अंतरवाली सराटी येथे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. याला पाठिंबा म्हणून प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी शेकटा येथील ३०० फुट उंच बीएसएनएल मोबाईल टावर चढून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रचा जीआर काढला जात नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली उतरणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ते टॉवरवर चढून होते.