औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आपत्ती व्यवस्थापनासाठी शहरातील नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वतंत्र टीम तयार करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. यासाठी महापालिका प्रशासन पुढाकार घेणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दिली.अलीकडेच शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जय भवानीनगर, नूर कॉलनीसह अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता. नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत औरंगाबाद महापालिकेची प्रमुख म्हणून निवड केली आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी मनपावर सोपविण्यात आली आहे.बारवाल यांनी शहरातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काय करता येईल, यासाठी सोमवारी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपयुक्त रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजय चौधरी उपस्थित होते. पोलीस विभागातील अपुºया मनुष्यबळावर मात करण्यासाठी आयुक्त यशस्वी यादव यांनी नागरिकांमधून विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आपत्ती व्यवस्थापनासाठीदेखील नागरिकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन टीम तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.आपत्ती निवारण दिवस१३ आॅक्टोबर हा आपत्ती व्यवस्थापन धोके निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार ९ ते १३ आॅक्टोबरदरम्यान आपत्तीविषयक रंगीत तालीम घेऊन नागरिकांना माहिती देण्यात येईल. महापालिका, खासगी शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्याचा निर्णय यावेळी झाला.
आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र टिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:43 AM