औरंगाबाद : स्पाईस जेटपाठोपाठ औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता ‘इंडिगो’ने विमान सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. ‘इंडिगो’ने आॅगस्टपासून विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन केले असून, त्यादृष्टीने १९ जुलै रोजी इंडिगोचे अधिकारी चिकलठाणा विमानतळावर सोयी-सुविधांची पाहणी करणार आहेत.इंडिगोकडून आजघडीला देशांतर्गत ५३ आणि १७ आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहेत. कंपनीची २३० विमाने असून, दररोज १,५०० पेक्षा अधिक उड्डाणे होतात. आता कंपनीने औरंगाबादहून विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.देशांतर्गत पर्यटन, उद्योग आणि व्यवसायवाढीसाठी औरंगाबादहून नवीन विमान सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी ११ जून रोजी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाची स्पाईस जेट आणि इंडिगोच्या व्यवस्थापकीय समितीसोबतबैठक झाली होती. यावेळी दोन्ही विमान कंपन्यांनी औरंगाबादमधून नव्या विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला होता.शुक्रवारी इंडिगोचे अधिकारी विमानतळाला भेट देणार आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांकडून विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रतिसाद मिळत आहे, असे विमानतळ संचालक डी.जी. साळवे यांनी सांगितले.
औरंगाबादहून लवकरच इंडिगोची विमानसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 4:35 AM