औरंगाबाद : तब्बल सात महिन्यांनंतर इंडिगोकडून गुरुवारपासून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली. या विमानाने पहिल्या दिवशी मुंबईहून ६१ प्रवासी औरंगाबादेत आले, तर ७८ प्रवासी औरंगाबादहून मुंबईला रवाना झाले, अशी माहिती विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दिली.
कोरोनामुळे मार्चपासून विमानांचे उड्डाण बंद झाले होते. तब्बल ३ महिन्यांंतर १९ जूनपासून इंडिगोने सर्वप्रथम औरंगाबादहून दिल्लीसाठी विमानसेवा सुरु केली. त्यानंतर इंडिगोने १५ जुलैपासून हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली. अनेक दिवस औरंगाबादहून मुंबई विमानसेवेची प्रतीक्षा केली जात होती. अखेर आता ७ महिन्यांनंतर इंडिगोची मुंबईसाठीही विमानसेवा उपलब्ध झाली आहे. हे विमान २५ आॅक्टोबरपासून दररोज उड्डाण घेणार आहे.
हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ एअर इंडियाने मुंबईसाठी २२ सप्टेंबरपासून औरंगाबादहून विमानसेवा सुरू केली. याबरोबर आता इंडिगोचे विमानसेवाही उपलब्ध झाली आहे. शहराची हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा वाढत आहे.