लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज उद्योग नगरीलगतच्या २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. आता मतदानानंतर उमेदवारांकडून मतांची आकडेमोड करण्यात येत असून, आता सर्वांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वरी, वाळूज, रांजणगाव, पंढरपूर, आंबेलोहळ, तीसगाव, नारायणपूर, कासोडा आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्या आहेत. या संपन्न ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीसह भाजप व इतर छोट्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या भागातील वाळूज, पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी या ग्रामपंचायतींमध्ये मातब्बर पदाधिकाऱ्यांनी स्वत:बरोबर कुटुंबातील सदस्यांनाही निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्यामुळे अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सक्षम उमेदवारांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत प्रचार केला. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी धनाढ्य उमेदवारांना आपला खिसा चांगलाच रिकामा करावा लागला. शुक्रवारी परिसरात शांततेत मतदान प्रकिया पार पडल्यानंतर उमेदवारांनी मतदान केंद्रावरुन एकूण मतदानाची आकडेवारी घेतली. रात्री उशिरापर्यंत उमेदवारांनी झालेल्या मतदानाची आकडेमोड करत आपल्या समर्थकांमार्फत आपल्याला किती मतदान होईल, याचा अंदाज बांधणे सुरू केले आहे.
धक्कादायक निकालाची शक्यता
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांविरोधात तरुणाई मैदानात उतरल्यामुळे अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. वर्षानुवर्षे विकासकामाचे स्वप्न दाखवून सत्ता भोगणाऱ्या प्रस्थापितांना नवख्या उमेदवाराची चांगलेच जेरीस आणल्याचे चित्र उद्योगनगरीत पाहायला मिळाले. यावेळी निवडणुकीत मतदानाचा टक्काही चांगलाच वाढल्यामुळे प्रस्थापित उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आता मतदान संपले असून, सोमवारी (दि. १८) लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याविषयी हॉटेल व चौकाचौकात गप्पांचे फड रंगत आहे.
------------------------------